शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे द्वार उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 07:13 AM2023-02-23T07:13:06+5:302023-02-23T07:14:23+5:30
सुप्रीम कोर्टाचे निर्देश; सर्वच घटकांतून निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत
शिखरचंद बागरेचा
वाशिम : समस्त जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर उघडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारी राेजी दिले आहेत. या निर्णयाचे सर्वच घटकांतून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माचे २३वे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवंतांची हवेत तरंगत असलेली मूर्ती आहे. एप्रिल १९८१ मध्ये मंदिराला न्यायालयीन आदेशाद्वारे ‘सील’ लावून मंदिरात दर्शन व पूजनासाठी मज्जाव केला होता. दिगंबर आणि श्वेतांबर पंथातील प्रत्येकी एक पुजारी पोलिसांच्या देखरेखीत दररोज मंदिराच्या आत जाऊन सकाळ, सायंकाळ केवळ दिवाबत्ती व आरती करीत आहे. सध्या सर्व भाविकांना एका छाेट्याशा झराेक्यातून दर्शनाचा लाभ घेता येताे. सन १९६० पासून दोन्ही पंथाच्या भाविकांसाठी पूजन व दर्शनाकरिता तीन-तीन तासांची वेळ निश्चित केली होती. त्यानुसार पूजन व दर्शनाच्या वेळेची प्रथा अखंडितपणे सुरू होती.
सर्वोच्च न्यायालयाने स्थगनादेश हटविल्याने आता मंदिराचे दार लवकर खुले हाेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. - ॲड. हर्ष सुराणा, याचिकाकर्त्यांचे वकील, दिल्ली