घरचा कर्ता गेला; निधीअभावी ९० कुटुंबांचा लाभ रखडला; जिल्ह्यातील वास्तव

By नंदकिशोर नारे | Published: October 10, 2023 03:56 PM2023-10-10T15:56:33+5:302023-10-10T15:56:46+5:30

यंदा सहा तालुक्यातील ७४ कुटुंबांना लाभ

The householder is gone; Benefit of 90 families stopped due to lack of funds; Reality in the vashim district | घरचा कर्ता गेला; निधीअभावी ९० कुटुंबांचा लाभ रखडला; जिल्ह्यातील वास्तव

घरचा कर्ता गेला; निधीअभावी ९० कुटुंबांचा लाभ रखडला; जिल्ह्यातील वास्तव

वाशिम : संसाराचा गाडा हाकताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला तर संसार अडचणीत येतो. अशा वेळी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या माध्यमातून अशा महिलांना शासकीय स्तरावर अनुदान देण्यात येते. यासाठी २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा या योजनेसाठी १६४ कुटुंबांचे प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी ७४ कुटुंबांना लाभ मिळाला असला तरी निधीअभावी ९० कुटुंबांना मात्र अद्यापही याचा लाभ मिळाला नाही.

दारिद्रयरेषेखालील रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर अडचणीत येणाऱ्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या २० हजार रुपयांच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील १६४ कुटुंबांकडून संबंधित तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर यासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून केवळ ७४ कुटुंबांनाच २० हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले.

तथापि, उर्वरित प्रस्तावांसाठी निधीच उपलब्ध नसल्याने ९० कुटुंबांना मात्र १० ऑक्टोबरपर्यंतही या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करीत जीवन जगावे लागत असल्याचे वास्तव आहे. शासनाकडून निधी मिळाल्यास या कुटुंबांना अनुदान मिळून कुटुंबाचा गाडा ओढताना आर्थिक अडचणीवर काही प्रमाणात मात करता येणार आहे. यामुळे मृत कुटुंबीयांकडून मदतीसाठी तहसील कार्यालयात येरझारा घातल्या जात आहेत.

अनुदानाची रक्कम अत्यल्प

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून दिला जाणारा निधी अल्प प्रमाणात आहे. केवळ २० हजारांच्या अनुदानातून आर्थिक हातभार होणे आजच्या महागाईच्या काळात अशक्य आहे. त्यामुळे शासनाने या योजनेच्या लाभार्थीना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासह प्रशासनाला वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थींकडून केली जात आहे.

काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना?

- दारिद्ररेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

कोणाला मिळते अनुदान?

दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास एक रकमी २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य शासनाकडून देण्यात येते.

Web Title: The householder is gone; Benefit of 90 families stopped due to lack of funds; Reality in the vashim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम