वाशिमच्या शहीद जवानावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार, रस्त्याच्या दूतर्फा नागरिकांची उपस्थिती
By संतोष वानखडे | Published: April 19, 2023 07:24 PM2023-04-19T19:24:06+5:302023-04-19T19:24:17+5:30
साश्रृनयनांनी जवानाला अखेरचा निरोप.
वाशिम (संतोष वानखडे) : भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात सहकाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वाशिम तालुक्यातील सोनखास येथील पॅरा कमांडो अमोल तानाजी गोरे या भारतीय जवानाला १७ एप्रिल रोजी वीरमरण आले. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५:२० वाजता शासकीय लष्करी इतमामात त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
शहिद अमोलचे पार्थिव पुणे येथून सैन्याच्या वाहनाने १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास वाशिम शहराच्या सीमेत येताच रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी पार्थिवावर पुष्पांची उधळून करून श्रद्धांजली अर्पण केली. दुपारी ३:३० वाजता शहीद अमोलचे पार्थिव त्याच्या सोनखास या मुळगावी पोहचल्यानंतर सर्वप्रथम घरी नेण्यात आले. त्यानंतर गावाजवळच असलेल्या शहीद अमोलच्या शेतात सायंकाळी ५:२० वाजता शासकीय लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
शहिद अमोलचा चार वर्षाचा मुलगा मयूर याने मुखाग्नी दिला. अंतिम संस्कार प्रसंगी सर्वप्रथम शहीद अमोलचे वडील तान्हाजी गोरे, आई मंदाबाई, पत्नी वैशाली, मुले मयूर व तेजस, भाऊ हनुमान गोरे, विवाहित बहिण उमेशा भिसडे यांनी पुष्पचक्र वाहिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सहायक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम. यांनी शहीद अमोलच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिली.
पॅरा युनिटचे मेजर सुबोध राठोड, मेजर अजयसिंग, भारतीय सैन्याच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहिद अमोलला मुलगा मयूर मुखाग्नी देत असताना वातावरण शोकाकुल झाले होते.