तक्रार येताच ‘सहकार’, पोलिस पथकाची चार सावकारांवर धाड
By दिनेश पठाडे | Published: December 6, 2023 06:06 PM2023-12-06T18:06:46+5:302023-12-06T18:07:28+5:30
मालमत्तेची कागदपत्रे, चेक, बाँड सापडले असून सहकार आणि पोलिस विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
वाशिम : रिसोड तालुक्यातील विविध व्यक्तींकडून सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या अवैध सावकारी व्यवहारसंबंधींच्या ४ तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार चौकशीकरिता सहकार व पोलिस विभागाकडील चार पथकांने ६ डिसेंबर रोजी रिसोड तालुक्यातील विविध ठिकाणच्या चार अवैध सावकारांवर धाड टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली.
रिसोड तालुक्यात बेकायेशीररित्या सावकारी व्यवसाय चालत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यामुळे सहकार आणि पोलिस विभागाने चार पथके गठीत करुन चार गावात बुधवारी धाड टाकली असता वंदना सत्यनारायण अग्रवाल(रा. केशवनगर), प्रदीप माणिकराव तिफणे(रा.लहेणी), परसराम बंडूजी सोनुने(रा.गोवर्धन), नारायण रामकृष्ण भावसार (रा. मथुरा नगर, रिसोड) यांच्याकडे झडती कारवाईदरम्यान काही ठिकाणी कथित अवैध सावकारी व्यवहारासंबंधाने पुढील चौकशीकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. यामध्ये स्थावर मालमत्तेची खरेदीखते, कोरे बाँड, धनादेश आदी कागदपत्रांचा समावेश आहे.
या कारवाईमध्ये अवैध सावकारी संदर्भात अनेक कागदपत्रे हाती लागली असून त्या संदर्भात पुढील चौकशी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली. ही कारवाई जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, विभागीयय सहनिबंधक व्ही.डी.कहाळेकर, जिल्हा निबंधक (सावकारी) दिग्विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक आर.आर. सावंत, एम.डी.कच्छवे, एम.बी.बनसोडे, पी.एन.झळके यांच्या पथकाने केली. चारही पथकामध्ये सहकार आणि पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.