त्यांच्यासाठी सर्पमित्र ठरला देवदूत; नागासह दंश झालेल्याचाही जीव वाचला!
By नंदकिशोर नारे | Published: September 26, 2023 09:15 PM2023-09-26T21:15:48+5:302023-09-26T21:16:19+5:30
ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नागपूर-संभाजी नगर महामार्गावर राजाकिन्ही येथे घडली.
वाशिम: उपाहारगृहात शिरलेल्या नागाने उपाहागृह चालकाला दंश केला. यामुळे नागाला मारण्याची तयारी होती, तर दंश झालेल्याचाही जीव धोक्यात होता. तथापि, याचवेळी तेथे देवदुतासारखा सर्पमित्र दाखल झाला. त्याने नागाला पकडून जंगलात सोडले आणि दंश झालेल्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलविण्याची सुचना केली. त्यामुळे नाग आणि रुग्णाचेही प्राण वाचले. ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नागपूर-संभाजी नगर महामार्गावर राजाकिन्ही येथे घडली.
नागपूर-संभाजीनगर महामार्गावर राजाकिन्ही येथे नंदु सोनोने (वय ३७ वर्षे), यांचे उपाहारगृह आहे. सोमवारी रात्री त्यांच्या उपाहारगृहात नाग शिरला. नंदु सोनोने यांचा या नागावर चुकीने पाय पडला. त्यामुळे नागाने लगेच त्यांना दंश केला. उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. यामुळे नंदू सोनाेने यांचा जीव धोक्यात आला होता, तर नागालाही ठार केले जाणार होते. त्याचवेळी तेथून जात असलेला सर्पमित्र अजय खंडारेला हा प्रकार कळला. त्याने लागलीच घटनास्थळी पोहोचून साडे चार फुटाच्या नागाला सुरक्षीत पकडून जंगलात सोडले, तर सर्पमित्र तथा वन्यजीवरक्षक आदित्य इंगोलेला ही माहिती दिली. त्यावरून आदित्य इंगोलेने सर्पदंश झालेल्या उपाहारगृह चालकावर तातडीने प्रथमोचार करून वाशिम येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे उपस्थितांनी सर्पदंश झालेल्या युवकाला तातडीने रुग्णालयात हलवल्याने त्याला वेळेत उपचार मिळू शकले. आता त्याची प्रकृती चांगली असल्याचे कळले.
दंश झालेल्या युवकाच्या चुकीचा प्रयोग
कुठल्याही विषारी सापाने चावा घेतल्यानंतर संबंधित रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असताना नंदू सोनोने यांना मात्र नाग चावल्यानंतर जखमेच्या ठिकाणी ब्लेडने वार करून चुकीचा प्रयोग करण्यात आला. दंश झालेल्या ठिकाणी ब्लेडने वार करणे किंवा बुवाबाजीचा आधार घेणे चुकीचे असून, रुग्णास रुग्णालयातच तातडीने हलविणे आवश्यक असल्याचे सर्पमित्र तथा वन्यजीवरक्षक अजय खंडारे आणि आदित्य इंगोले यांनी सांगितले.
सर्पदंश झालेल्या वेळेत उपचार मिळाल्याने रुग्णाची प्रकृृती आता उत्तम आहे. रुग्णालयात या रुग्णावर काहजीपूर्वक लक्ष ठेवण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. अनिल कावरखे, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम