चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने पळविले! किन्हिराजा येथील संस्थानमध्ये चोरी
By संतोष वानखडे | Published: May 27, 2023 12:34 PM2023-05-27T12:34:31+5:302023-05-27T12:35:05+5:30
दानपेटीतील रक्कमही लंपास
वाशिम : अलिकडच्या काळात चोरट्यांनी मंदिर, संस्थानकडे मोर्चा वळविला असून दानपेट्यांवर डल्ला मारणे सुरू केल्याने भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शुक्रवार, २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी किन्हीराजा (ता.मालेगाव) येथील माता कमलेश्वरी संस्थानमधील देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह दानपेटीतील रोख रक्कमही लंपास केली.
जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, शिरपूर, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर या शहरांसह ग्रामीण भागातही प्रामुख्याने मोठी देवस्थाने, मंदिरे वसलेली आहेत. अलिकडच्या मंदिरांमध्ये चोऱ्या होत असल्याने भाविकांसह संस्थान, मंदिर विश्वस्त मंडळही अलर्ट झाले आहे. भुरट्या चोरांकडून मंदिरांमधील दानपेटी फोडून किरकोळ रक्कम लंपास झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.
२६ मे रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास किन्हिराजा येथील माता कमलेश्वरी संस्थानमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. माता कमलेश्वरी देवीच्या अंगावरी सोन्या-चांदीच्या दागिण्यासह दान पेटीतील रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. याप्रकरणी जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.