बर्निंग बाईकचा थरार; पाहता पाहता बेचिराख झाल्या दोन ईलेक्ट्रिक बाईक!
By नंदकिशोर नारे | Published: April 25, 2023 04:12 PM2023-04-25T16:12:03+5:302023-04-25T16:12:50+5:30
बर्निंग बाईकचा हा थरार वाशिम शहरातील पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला.
वाशिम: बॅटरी चार्जिंगला लावली असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ईलेक्ट्रिक बाईकने पेट घेतला. लगतच्या बाईकही आगीच्या कवेत आल्या अन् पाहता पाहता दोन इलेक्ट्रिक बाईक अवघ्या काही मिनिटांतच बेचिराख झाल्या, तर इतर तीन बाईकचेही नुकसान झाले. बर्निंग बाईकचा हा थरार वाशिम शहरातील पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला.
मागील काही दिवंसापासून वाढत्या उन्हामुळे वाहने पेटण्याच्या घटनांत वाढ होत आहे. याच आठवड्यात वाशिम शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उभी कार पेटल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पाटणी कर्मशियल कॉम्पलेक्समध्ये पुन्हा बर्निंग बाईकचा थरार नागिरकांनी अनुभवला. इलेक्ट्रिक बाईक रिपरेअरिंगच्या दुकानात दुरुस्तीसाठी आणलेली एक इलेक्ट्र्रिक बाईक चार्जिंगला लावली असताना काही वेळाने उन्हामुळे शॉर्टसर्किट होऊन ती पेटली, लगेच जवळ उभ्या बाईकने पेट घेतला.
परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांना हे चित्र दिसताच त्यांनी धावाधाव करून इतर बाईक हटविल्या. त्यावेळी जवळच असलेल्या गजानन भोजनालयाच्या संचालकांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी धावाधाव करून पाणी टाकत आगीवर नियंत्रण मिळवले; परंतु तोपर्यंत दोन बाईक जळून खाक झाल्या, तर इतर तीन बाईकचेही थोडेफार नुकसान झाले. घटनेची माहिती मिळतास वाशिम पालिकेचे अग्नीशमन दल दाखल झाले; परंतु तोपर्यंत दोन बाईक जळून खाक झाल्या होत्या.
वाहनांना उन्हात ठेवणे घातक
जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशाच्यावर पोहोचला आहे. त्यामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशात कुठलेही वाहन रखरखत्या उन्हात उभे करणे घातक ठरू शकते. यातून केवळ वाहनच राख होण्याची भिती नाही, तर लगतचा परिसरही आगीच्या कवेत येण्याची भिती आहे.
थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
पाटणी कर्मशियलमध्ये ईलेक्ट्रिक बाईक पेटल्याची घटना घडल्याचे कळताच संपूर्ण कॉम्प्लेक्समधील व्यावसायिक, नागरिकांसह परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पेटलेल्या ईलेक्ट्रिक बाईक पाहण्यासाठी शेकडो जणांनी गर्दी केली होती. यावेळी निघालेल्या धुराचे काळेकुट्ट लोळ आकाशात पसरल्याने आगीची भीषणता स्पष्ट होत होती.