संसार होताहेत उद्ध्वस्त, तरूण व्यसनाधीन; गावातील दारूविक्री बंद करा!
By संतोष वानखडे | Published: February 8, 2024 05:45 PM2024-02-08T17:45:37+5:302024-02-08T17:46:08+5:30
मोहजा बंदी येथील महिलांनी निवेदनात असे नमूद केले आहे की, आमच्या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे.
रिसोड तालुक्यातील मोहजा बंदी येथे अवैध दारू विक्री होत आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात तरूण पिढी दारूच्या आहारी जात असल्याने त्यांचे भविष्यही अंधकारमय हाेत आहे, त्यामुळे गावातील दारूविक्री बंद करा, अशी मागणी करण्यासाठी मोहजा बंदी येथील महिलांनी गुरुवारी रिसोड पोलीस ठाण्यात धडक देत ठाणेदारांना निवेदन दिले.
मोहजा बंदी येथील महिलांनी निवेदनात असे नमूद केले आहे की, आमच्या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. त्यामुळे तरूण पिढी दारूच्या आहारी जात आहेत. गावातील तरूण दरदिवशी दारू पिऊन गावात भांडण-तंटे करून शांतता भंग करीत आहेत, तसेच दारूच्या व्यसनापायी अनेक लोकांचे हसते-खेळते संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी मोहजा बंदी गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कार्यवाही करून महिला व गावकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. निवेदन देतेवेळी मोहजाबंदी गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.