नाट्यगृहाअभावी नाट्यकर्मींची परवड
By Admin | Published: April 1, 2017 04:45 PM2017-04-01T16:45:10+5:302017-04-01T16:45:10+5:30
वाशिम: नाट्यक्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे कलाक्षेत्राशी निगडीत असलेले हे क्षेत्र जिल्ह्यातून हद्दपार होत असल्याचे दिसते.
वाशिम: नाट्यक्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे कलाक्षेत्राशी निगडीत असलेले हे क्षेत्र जिल्ह्यातून हद्दपार होत असल्याचे दिसते. नाट्यकर्मीेंंच्या कलेस वाव देण्यासह तरुणाईला या क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात नाट्यगृहे उभारून त्याद्वारे विविध कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक झाले आहे.
चित्रपट, नाटक ही मनोरंजनाची माध्यमे तशी सर्वांनाच हवीहवीशी असतात. आजची तरुणाई तर या कला आणि नाट्यक्षेत्रात आकंठ बुडाली आहे. अभ्यास करण्याबरोबरच थोडासा विरंगुळा म्हणून अनेकांना नाट्यगृहात जावे वाटणे गैर नाही. वाशिमकर तरुणाईला मात्र नेमकी हीच उणीव जाणवत आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी नाट्य, चित्रपट व कला ही आवडीची क्षेत्रे आहेत. नवनवीन नाटके, नवे चित्रपट पाहण्याचा छंद जोपासणारे तरुण प्रेक्षक शहरात मोठ्या संख्येने आहेत; परंतु वाशिमकर मात्र त्याला पारखे राहतात. सर्व सोयीसुविधांनीयुक्त अशा नाट्यगृहांची येथे वाणवा आहे. नाट्यगृहाचा अभाव असण्यामुळे तरुण-तरुणींना कलेची आवड असतानाही उदयोन्मुख कलाकारांना नाट्यक्षेत्रात भरारी घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात मंगरुळपीर येथे एक सांस्कृतिक भवन असले तरी, त्याचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले प्रयोग करणेही तेवढेच गरजेचे झाले आहे.
----------------
क्रीडासंकुलाच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात एक नाट्यगृह आणि जिल्हास्तरीय नाट्यगृह असावे. शासनाने नाट्यकर्मीसाठी या योजनेचा विचार करावा.
- श्रीकांत भाके (प्रमुख कार्यवाह), अ.भा. मराठी नाट्य परिषद वाशिम