मंगरुळपीरच्या जैन मंदिरातील प्राचीन मूर्तीची चोरी
By admin | Published: August 17, 2015 01:34 AM2015-08-17T01:34:30+5:302015-08-17T01:34:30+5:30
मूर्तीच्या चोरीची घटना भरदिवसा घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.
मंगरुळपीर (जि. वाशिम) : शहरातील सुभाष चौक परिसरात असलेल्या जैन मंदिरातील प्राचीन मूर्ती अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मंदिरातील मूर्तीच्या चोरीची घटना भरदिवसा घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगरुळपीर शहरातील चारभूजा मंदिरानजीक राहणारे भद्रेश अमृतलाल मेहता (४0) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले की, शहरातील सुभाष चौक परिसरात जैन धर्मीयांच्या २४ तीर्थंकरापैकी १२ वे तीर्थंंकर असलेले वासुपूज्य स्वामी यांचे मंदिर आहे. या मंदिरात तीर्थंंकर वासुपूज्य स्वामीजी यांची पंचधातूंची १ किलो वजनाची ४00 वर्षांंपूर्वीची प्राचीन मूर्ती सकाळी ११ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार हेमंत गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार साखरकर करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय वाळके, ठाणेदार हेमंत गिरमे यांनी घटनास्थळाला भेट देऊन शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मानोरा शहरातील जैन मंदिरातूनही प्राचीन मूर्तींंची चोरी झाली होती. हे येथे उल्लेखनीय.