मालेगावातील चोरीचा छडा; सराईत चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:20+5:302021-03-04T05:18:20+5:30
१८ जानेवारी, २०२१ रोजी रात्री घडलेल्या चोरीच्या घटनेची अधिक माहिती अशी की, शहरात मोबाइल आणि घड्याळ विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले ...
१८ जानेवारी, २०२१ रोजी रात्री घडलेल्या चोरीच्या घटनेची अधिक माहिती अशी की, शहरात मोबाइल आणि घड्याळ विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले न्यू वॉच सेंटरचे मालक शेख शकील शेख मुसा (रा. गांधी नगर, मालेगाव) यांनी नेहमीप्रमाणे १९ जानेवारी रोजी सकाळी दुकान उघडले असता, त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. मोबाइल दुरुस्तीच्या खोलीला छिद्र पाडून तथा सीसी कॅमेऱ्याची वायर कापून चोरट्यांनी चोरीचा डाव साधलेला होता. दुकानातील मोबाइल फोन, घड्याळ व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८३ हजार ५९० रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. शेख शकील शेख मुसा यांनी १८ जानेवारीला या प्रकरणी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर कलम ३८०, ४६१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
तपासादरम्यान सायबर सेलच्या चमूने चोरी झालेला एक मोबाइल अॅक्टिव्हेट झाल्याचे लक्षात येताच, लोकेशन तपासले असता, ते लहुजीनगर (गोरेगाव, जि.हिंगोली) येथे दाखविले गेले. सदर सिम संतोष ज्ञानबा खिल्लारी याच्या नावाने नोंदणीकृत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गोरेगाव येथे जाऊन संतोष खिल्लारीच्या घराची झाडाझडती घेतली. मोबाइल मित्राकडून विकत घेतल्याचे त्याने सांगितले. संतोषच्या पत्नीकडेही नवीन मोबाइल होता. दोन्ही मोबाइल चोरीचे असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यामुळे आरोपीने घरात लपवून ठेवलेला १ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांना दाखविला. तो जप्त करून पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले, कैलास कोकाटे, गणेश बोडखे करीत आहेत.