चाकूचा धाक दाखवून सोने-चांदीचे दागिने लंपास, पाच चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 08:48 PM2018-11-23T20:48:30+5:302018-11-23T20:48:32+5:30
महागाव येथील नंदाबाई भीमराव हुंबाड यांच्या घरी २२ ते २३ नोव्हेंबरच्या रात्री तोंडाला पट्टी बांधून असलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून २ लाखांवर किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले.
रिसोड : तालुक्यातील महागाव येथील नंदाबाई भीमराव हुंबाड यांच्या घरी २२ ते २३ नोव्हेंबरच्या रात्री तोंडाला पट्टी बांधून असलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून २ लाखांवर किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून पाच चोरट्यांविरुद्ध रिसोड पोलिसांनी २३ नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ माजली आहे.
याबाबत नंदाबाई हुंबाड यांनी पोलिसांत नोंदविलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की २२ नोव्हेंबरच्या रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास घरातील जिन्यामधून तोंडाला पट्टी बांधून असलेल्या पाच चोरट्यांनी घरात प्रवेश केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आरडोओरड केली असता, त्यातील एका चोरट्याने चाकू काढून धाक दाखविला. यावेळी दुसऱ्या एका चोरट्याने झोपलेल्या मुला-मुलीवर जाऊन आवाज केल्यास कु-हाडीने जीवे मारण्याची धमकी दिली. या चोरट्यांपैकी एकाच्या तोंडावरील कपडा घसरल्याने आपण त्यास ओळखले असून, तो सोयाबीनचे खळे करणारा बाळू लक्ष्मण चव्हाण (प्रतापपूर, ता. मेहकर) येथील असल्याचे फिर्यादीने नमूद केले. जीवाच्या भीतीने मी व माझ्या मुलांनी अंगावरील सोने काढून दिले. नंतर चोरट्यांनी घरातील कपाट उघडून त्यातील सोन्याच्या अंगठ्या व चांदीचे दागिने, मोबाईल असा एकंदरित २ लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तब्बल दोन तास चोरट्यांनी आम्हाला घरात अत्यंत दहशतीत ठेवले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाचही चोरट्यांविरुद्ध भादंविचे कलम ३९५, ४२७ अन्वये गुन्हे दाखल केले.
.............
गावक-यांनी केला चोरट्यांचा पाठलाग!
नंदाबाई हुंबाड यांच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी सुधाकर मवाळ यांच्या गोइ्यातील सोयाबिनचे पोते लंपास केले. इथपर्यंत चोरट्यांनी ठरविल्यानुसार सर्व घडत असतानाच त्यातील एकाने उभ्या ट्रॅक्टरच्या चाकात चाकू भोसकल्याने त्यातील हवेचा जोरदार आवाज होवून मजूर जागे झाले. त्यांनी पळणा-या चोरट्यांचा पाठलाग करून बाळू लक्ष्मण चव्हाण यास ताब्यात घेतले. त्याला रिसोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास रिसोड पोलिस करित आहे.