धक्कादायक, सरकारी विहिरीवरून पाण्याची चोरी! दोन मोटारपंपासह साहित्य जप्त
By संतोष वानखडे | Published: May 16, 2024 04:52 PM2024-05-16T16:52:34+5:302024-05-16T16:53:08+5:30
जि.प. सीईओंच्या पथकाची कारवाई.
संतोष वानखडे, वाशिम : जोगेश्वरी (ता.रिसोड) येथे सरकारी विहिरीतून पाण्याची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या निदर्शनात आल्याने, दोन मोटारपंपासह इतर साहित्य जप्त करण्यात आले.
जल जीवन मिशन अंतर्गत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जोगेश्वरी (तपोवन) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी भेट दिली. या गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन विहिरीचे ठिकाण निश्चित करण्याबाबतच्या तक्रारीनुसार त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान जोगेश्वरी येथील जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जुन्या विहिरीची पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान या सरकारी विहिरीमधून मोठ्या प्रमाणात विनापरवाना पाण्याची चोरी होत असल्याची बाब सीईओ वाघमारे यांच्या निदर्शनास आली. या बाबीची गंभीर दखल घेऊन त्यांनी सर्वांसमक्ष सदर विहिरीमधून दोन मोटारपंप, केबल, पाईप आणि इतर साहित्य जप्त करून ग्रामपंचायतच्या हवाली केले. यावेळी जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे, जोगेश्वरीचे सरपंच दीपक वाळूकर, ग्रामसेवक विलास शिंदे, पोलीस पाटील दिलीप वाळूकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जोगेश्वरी येथील सरकारी विहिरीमधून पाण्याची चोरी होत असल्याची घटना गंभीर असून या कारवाईवरून इतरांनी बोध घ्यावा. यापुढे असा प्रकार आढळल्यास केवळ जप्तीवर न थांबता संबंधितावर फौजदारी कारवाईदेखील केली जाईल.-वैभव वाघमारे,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वाशिम