मालेगाव गट व मानोरा गणाबाबत संभ्रम कायम
By admin | Published: July 21, 2015 12:52 AM2015-07-21T00:52:12+5:302015-07-21T00:52:12+5:30
एक गट व दोन गण खारीज होण्याची शक्यता ; मालेगाव, मानो-याला मिळाला नगर पंचायतीचा दर्जा.
वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव व मानोरा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर झाले आहे. दरम्यान, त्यामुळे जिल्हा परिषदेचा मालेगाव गट, दोन गण आणि मानोरा पंचायत समितीचा गण येत्या काळात खारीज होण्याची शक्यता आहे. परिणामी, जिल्हा परिषदेच्या गटाची संख्या ५२ वरून ५१ वर येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग तथा पालिका प्रशासनाकडे याबाबत अधिकृतस्तरावर अद्याप कुठलाही आदेश आलेला नसला तरी त्याबाबत जिल्हा परिषद वतरुळामध्ये चर्चा आहे. नाही म्हणायला एक गट व तीन गणांमध्ये कार्यरत असलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याबाबतचे पत्र ग्रामविकास व जलसंधारण विभाग तथा राज्य शासनाचे सहसचिव पी. एन. गौड आणि उपसचिव गिरीश भालेराव यांच्या स्वाक्षरीची पत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील पालिका प्रशासन विभागास प्राप्त झाले आहेत. मालेगाव गट आणि त्यातंर्गत समाविष्ट असलेले पूर्व आणि पश्चिम असे दोन गणासोबतच मानोरा गण खारीज करण्याबाबत अधिकृतस्तरावर सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यामुळे सध्या या विषयासंदर्भात जिल्हा परिषद वतरुळामध्ये काहीसी संभ्रमावस्था आहे. तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा बहाल करण्याच्या दृष्टीने २0१३ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. त्यानुषंगाने मालेगाव व मानोरा ग्रामपंचायतींचा हा दर्जा देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. राज्यातील अशा ३0 ग्रामपंचायतींना हा दर्जा देण्यात आला आहे. मालेगाव व मानोर्याबाबत हा निर्णय काहीसा उशिरा झाला आहे. १७ जुलै रोजी यासंदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभाग आणि नगर विकास विभागाने अधिसूचना काढली होती. त्याची ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर लगोलग अंमलबजावणी करण्यात येऊन दोन्ही ठिकाणच्या ग्रामपंचायत खारीज करून तहसीलदारांना तेथे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याबाबतची प्रारंभीची अधिसूचना ही ३0 मार्च २0१४ ला निघाली होती.