वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेश संख्येऐवढेही अर्ज नाहीत; ३९ जागा राहणार रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:17 PM2018-03-08T14:17:26+5:302018-03-08T14:17:26+5:30
वाशिम : वाशिम जिल्ह्यात अंतिम मुदतीपर्यंत एकूण ११७३ जागेसाठी ११३४ आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर झाल्याने ३९ जागा रिक्तच राहणार, यात शंका नाही.
वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत दिला जातो. वाशिम जिल्ह्यात अंतिम मुदतीपर्यंत एकूण ११७३ जागेसाठी ११३४ आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर झाल्याने ३९ जागा रिक्तच राहणार, यात शंका नाही.
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीईअंतर्गत वाशिम जिल्ह्यात १०२ खासगी शाळांची नोंदणी झालेली आहे. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के मोफत कोट्यातून प्रवेश देण्यासाठी १० फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. ११७३ जागा असल्याने यापेक्षा जास्त अर्ज सादर होणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात एकूण प्रवेश संख्येऐवढेही अर्ज प्राप्त झाले नाहीत. ११३४ अर्ज प्राप्त झाल्याने ३९ जागा रिक्त राहणार आहेत. त्यातही शहरातील नामांकित शाळांसाठी विहित जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याने लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी मोफत प्रवेशाच्या अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.