कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’च नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:25 AM2021-01-10T11:25:55+5:302021-01-10T11:28:49+5:30

Karanja sub-district hospital उपजिल्हा रुग्णालयाचे स्थापनेपासून (सन २०१७) फायर ऑडिटच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली. 

There is no fire audit of Karanja sub-district hospital! | कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’च नाही!

कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’च नाही!

googlenewsNext
ठळक मुद्दे१०० खाटांचे असलेले कारंजा उपजिल्हा रुग्णालय हे  २०१८ मध्ये कार्यान्वित झाले.फायर ऑडिटसंदर्भात संबंधितांशी पत्रव्यवहार केला जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भंडारा येथील भयंकर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’चा प्रश्न ऐरणीवर आला असून, शनिवारी ‘लोकमत’ने रिअ‍ॅलिटी चेक केले असता कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे स्थापनेपासून (सन २०१७) फायर ऑडिटच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली. 
भंडारा येथील सामान्य रुग्णालयाला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीच्या घटनेत १० बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडरची परिस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भात ‘रिअ‍ॅलिटी चेक’ केले असता  काही गंभीर बाबी समोर आल्या. १०० खाटांचे असलेले कारंजा उपजिल्हा रुग्णालय हे  २०१८ मध्ये कार्यान्वित झाले असून, आवश्यक  भौतिक सुविधा उपलब्ध न करताच या इमारतीचे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण केल्याचे सांगण्यात येते. रॅम्पचे बांधकाम, महाराष्ट्र फायर सेफ्टी अ‍ॅक्ट २००२ च्या मानकानुसार अग्निशमन यंत्रणा, संकटकाळी सुटकेचा मार्ग तसेच विद्युत पुरवठा व रोहित्र बसविणे याशिवाय इतर महत्वाच्या बाबींची पुर्तता झाली नाही. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊसाहेब लहाने यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजाच्या सहायक अभियंत्यांशी पत्रव्यवहारही केला. परंतू, अद्याप हा प्रश्न निकाली निघू शकला नसल्याचे डॉ.लहाने यांनी सांगितले. त्यामुळे एखाद्यावेळी आग लागल्यास नियंत्रण मिळवावे कसे, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.दरम्यान, वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे गतवर्षी फायर ऑडिट झाले होते. ११ महिन्यानंतर फायर ऑडिट करणे आवश्यक असून,  लवकरच फायर ऑडिटसंदर्भात संबंधितांशी पत्रव्यवहार केला जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.


अग्निरोधक सिलिंडरची पाच वर्षाची मुदत 
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागात खबरदारीचा उपाय म्हणून अग्निरोधक सिलिंडर बसविण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१८ मध्ये तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात २०१८ मध्ये अग्निरोधक सिलिंडर बसविण्यात आले आहेत. या सिलिंडरची मुदत पाच वर्षे असून, वर्षातून एकदा संबंधित कंपनीकडून पाहणी होणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निरोधक सिलिंडरची पाहणी २०१९ मध्ये केली होती. तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील पाहणी अनियमित असल्याची माहिती आहे. 


अग्निशमन यंत्रणेची शनिवारी तपासणी
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले असून, अग्निरोधक सिलिंडरही अद्ययावत आहेत. आगीच्या घटना घडू नये तसेच आगीच्या घटनेवर वेळीच नियंत्रण मिळावे म्हणून शनिवारी पुन्हा अग्निशमन यंत्रणेची पाहणी करण्यात आली. यापुढेही अधिक दक्षता घेण्यात येईल.
- डॉ. मधुकर राठोड, 
जिल्हा शल्य चिकित्सक


कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा, संकटकाळी सुटकेचा मार्ग यासह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात बांधकाम विभागाशी पाठपुरावा केलेला आहे. अद्याप सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
- डॉ. भाऊसाहेब लहाने 
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कारंजा


  फायर ऑडिट म्हणजे काय?

  •   फायर ऑडीट हे संबंधित इमारत बांधल्यानंतर एकदाच हाेते. त्यानंतर तेथील उपकरणे सुरळीत आहेत किंवा नाही याची दर ११ महिन्यांनी तपासणी करून तसे प्रमाणपत्र अग्निशामक दलाकडून घ्यावे लागते. 
  •   पालिकेचा अग्निशामक विभाग हे ऑडीट करत असतो. पालिकेचा एक अधिकारी व सहाय्यक अग्नीशमन अधिकाऱ्यांचा यात समावेश असतो.
  •  संबंधित इमारतीची उंची व खोल्यांची संख्या विचारात घेवून त्यानुसार फी आकारल्या जाते.
  •   एका दिवसात पाहणी पुर्ण होते. यात तेथील पाईप योग्य आहे का? स्प्रींकलर कार्यरत आहेत का?, पाण्याची टाकी सुस्थितीत आहे का? याची पाहणी केली जाते.
  •   पाहणीनंतर तसे प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाला किंवा विभागाला दिले जाते.
  •   पालिकेच्या हद्दीत अशा ऑडीटसाठी कमी फी आकारल्या जाते. हद्दीबाहेर वाढीव फी आकारल्या जाते.
  •   पाहणीमध्ये अग्निशामक यंत्राचे प्रेशर योग्य आहे का? रिफिलिंग करण्याची गरज आहे का? यंत्राला नोझल योग्य पद्धतीने बसवलेले आहेत का? याचीही तपासणी होते.

Web Title: There is no fire audit of Karanja sub-district hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.