कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे ‘फायर ऑडिटच’च नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:58+5:302021-01-10T04:31:58+5:30
भंडारा येथील सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेत काही रुग्णांचा करुण अंत झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, ...
भंडारा येथील सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेत काही रुग्णांचा करुण अंत झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडरची परिस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भात ‘रिअॅलिटी चेक’ केले असता कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील काही गंभीर बाबी समोर आल्या. १०० खाटांचे असलेले कारंजा उपजिल्हा रुग्णालय हे २०१७ पासून रुग्णसेवेत आले असून, रुग्णालय इमारतीत आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध न करताच या इमारतीचे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले. रॅम्पचे बांधकाम, महाराष्ट्र फायर सेफ्टी अॅक्ट २००२ च्या मानकानुसार अग्निशमन यंत्रणा, संकटकाळी सुटकेचा मार्ग तसेच विद्युत पुरवठा व रोहित्र बसविणे याशिवाय इतर महत्वाच्या बाबींची पुर्तता झाली नाही. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊसाहेब लहाने यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजाच्या सहायक अभियंत्यांशी पत्रव्यवहारही केला. परंतू, अद्याप हा प्रश्न निकाली निघू शकला नसल्याचे डॉ.लहाने यांनी सांगितले. दरम्यान, वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे गतवर्षी फायर ऑडिट झाले होते. ११ महिन्यानंतर फायर ऑडिट करणे आवश्यक असून, २०२१ मध्ये लवकरच फायर ऑडिटसंदर्भात संबंधितांशी पत्रव्यवहार केला जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
०००००००
अग्निरोधक सिलिंडरची पाच वर्षाची मुदत
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागात खबरदारीचा उपाय म्हणून अग्निरोधक सिलिंडर बसविण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१८ मध्ये तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात २०१८ मध्ये अग्निरोधक सिलिंडर बसविण्यात आले आहेत. या सिलिंडरची मुदत पाच वर्षे असून, वर्षातून एकदा संबंधित कंपनीकडून पाहणी होणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निरोधक सिलिंडरची पाहणी २०१९ मध्ये केली होती तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील पाहणी अनियमित असल्याची माहिती आहे.
०००००
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले असून, अग्निरोधक सिलिंडरही अद्ययावत आहेत. आगीच्या घटना घडू नये तसेच आगीच्या घटनेवर वेळीच नियंत्रण मिळावे म्हणून शनिवारी पुन्हा अग्निशमन यंत्रणेची पाहणी करण्यात आली. यापुढेही अधिक दक्षता घेण्यात येईल.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक
०००००००००
कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा, संकटकाळी सुटकेचा मार्ग यासह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात बांधकाम विभागाशी पाठपुरावा केलेला आहे. अद्याप सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
- डॉ. भाऊसाहेब लहाने
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कारंजा