जलकुंभाला ‘झाकण’ बसविण्यासाठी निधीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 02:05 PM2019-07-20T14:05:57+5:302019-07-20T14:06:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या २८ गावे पाणी पुरवठा योजनेच्या वाईगौळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या २८ गावे पाणी पुरवठा योजनेच्या वाईगौळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीत मृतावस्थेतील कुत्रा आढळून आल्याच्या एका महिन्यानंतरही कारखेडा, धानोरा, यावळी यासह अन्य गावातील पाण्याच्या टाक्यांना ‘झाकण’ बसविण्यात आले नाहीत. निधी उपलब्ध नसल्याने हा प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
मानोरा तालुक्यातील २८ गावांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वाईगौळ येथील जलशुध्दीकरण केंद्र परिसरातील पाण्याच्या टाकीत २० जून रोजी मृतावस्थेत कुत्रा आढळून आला होता. जलकुंभात मृतावस्थेतील कुत्रा आढळून येणे ही बाब म्हणजे नागरिकांशी जीवाशी खेळण्याचाच प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया २८ गावातील नागरिकांमधून उमटल्या होत्या. या घटनेपासून बोध घेऊन या २८ गावातील पाण्याच्या टाक्या सुरक्षीत ठेवणे आवश्यक होते. परंतू, अद्याप अनेक गावातील पाण्याच्या टाक्यांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून झाकण किंवा आवरण नाही. त्यामुळे एखाद्या जलकुंभात पुन्हा एकदा अन्य वन्यप्राणी किंवा कुणीतरी पडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारखेडा, धानोरा, सावळी यासह अन्य तीन ते चार गावातील जलकुंभ वाºयावर असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एका महिन्याच्या कालावधीतही सुरक्षित उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने प्रशासकीय दिरंगाई चव्हाट्यावर आली आहे. २८ गावे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या जलकुंभाला झाकण बसविण्यासाठी निधी मिळावा याकरीता वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला मान्यता मिळाली नसल्याने तुर्तास हा प्रश्न प्रलंबित आहे.
२८ गावे पाणी पुरवठा योजने अंर्तगत सर्व जलकुंभाला ‘झाकण’ बसवण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. निधी उपलब्ध होताच झाकण बसवण्यात येतील.
- गजानन खराटे, शाखा अभियंता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मानोरा