जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशीही अंत्यसंस्कार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 06:05 PM2018-09-18T18:05:53+5:302018-09-18T18:10:03+5:30
कारंजा लाड: जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबर रोजीही अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. त्यांचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप पुन्हा करीत, धोपे कुटुंबियांनी कारवाईच्या मागणीवर ठाम राहत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबर रोजीही अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. त्यांचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप पुन्हा करीत, धोपे कुटुंबियांनी कारवाईच्या मागणीवर ठाम राहत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी झीरो एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन देऊनही धोपे कुटुंब पार्थिव ताब्यात घेण्यास तयार झाले नाही.
सीमा सुरक्षा दलात मेघालयातील सिलाँग येथे कार्यरत असताना कारंजा येथील जवान सुनील ढोपे यांचा १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारंजा येथे दाखल झाले; परंतु सुनीलचा मृत्यू घातपाताने झाल्याचा आरोप करीत धोपे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री १० वाजता सुनील धोपे यांचे पार्थिव अमरावती येथील शवागारात पाठविण्यात आले. मंगळवार १८ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा पालिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी कारंजा धोपे कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी झीरो एफआयआर दाखल करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले; परंतु धोपे कुटुबांने त्यांचा प्रस्ताव फेटाळला. प्रत्यक्षात धोपे यांचा मृत्यू १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास झाला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला चार दिवस उलटले तरी, अंत्यसंस्कार पार पडू शकले नाहीत. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजीही या प्रकरणी कारंजात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे एस टी बससेवा तसेच खाजगी वाहतूक देखील प्रभावित झाली होती.
विधवा पत्नी व्यथीत
जवान धोपे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या विधवा पत्नी सविता धोपे म्हणाल्या की, त्यांच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, नोकरी सोडण्याचा पळपुटेपणा आपण करणार नसल्याचे पतीने म्हटले होते, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली नाही असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ते सहा महिन्यानंतरच एकदा रजेवर यायचे. मी सहा महिने त्यांची प्रतिक्षा करीत होती. आता कोणाची प्रतिक्षा करू, आमच्या मुला-बाळांचे कसे होईल, पतीला न्याय न मिळाल्यास आपण जिवाचे बरे वाईट करू, असा इशाराही त्यांनी दिला.