परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर तपासणीच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:16 AM2021-02-18T05:16:36+5:302021-02-18T05:16:36+5:30
राज्यात दाखल होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाने कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल दाखविणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहे; परंतु वाशिम येथील रेल्वे स्थानकावर ...
राज्यात दाखल होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाने कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल दाखविणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहे; परंतु वाशिम येथील रेल्वे स्थानकावर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल किंवा तपासणी केली जात नाही. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. तेव्हा रेल्वे सेवा बंद होती. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने अनलॉकच्या टप्प्यात रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. वाशिम मार्गे सध्या दोन रेल्वे धावतात. याशिवाय काही विशेष रेल्वेही धावतात. गत आठवड्यापासून परराज्यात तसेच शेजारील जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. राज्य शासनाने परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसंदर्भात मार्गदर्शक सूचना यापूर्वीच जारी केल्या आहेत. परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल दाखविणे अनिवार्य करण्यात आले; मात्र वाशिम रेल्वे स्थानकावर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांचा कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल पाहण्यात येत नाही तसेच प्रवाशांची तपासणीही केली जात नाही. रेल्वे स्थानकात कोरोना टेस्टिंगची सुविधादेखील उपलब्ध नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याने रेल्वे व बसस्थानक हे ‘कोरोनाचे वाहक’ ठरू नये, म्हणून आतापासूनच संबंधित यंत्रणेने आवश्यक त्या उपाययोजना व खबरदारी घेणे अपेक्षित आहे.
00०००
वाशिम रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची तपासणी करण्याची किंवा कोरोना टेस्टिंगची सुविधा उपलब्ध नाही.
- एम. टी. उजवे,
रेल्वे स्टेशन मास्तर, वाशिम