‘अंगणवाडी अॅप’मध्ये मराठीच नाही; सेविकांमध्ये गोंधळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:39+5:302021-04-18T04:40:39+5:30
जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, जवळपास तेवढ्याच संख्येत अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व ...
जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, जवळपास तेवढ्याच संख्येत अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन दिले. पूर्वी अंगणवाडी सेविकांना सर्व माहिती रजिस्टरमध्ये नोंद करावी लागत असे. मात्र आता अंगणवाडी सेविका मोबाइलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधावाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती संगणकीय प्रणालीद्वारे भरण्यात येत आहे. केंद्र शासनाच्यावतीने अंगणवाडी सेविकांना पोषण आहाराशी संबंधित माहिती भरण्यासाठी ‘पोषण ट्रॅकर अॅप’ उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या अॅपवर मराठी भाषा नसल्याने अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहेत. अॅपवर इंग्रजी व हिंदी या दोनच भाषांचा समावेश आहे. बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंबंधी दैनंदिन माहिती ऑनलाईन व्हावी, यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल रिचार्जची रक्कम देऊनही माहिती मोबाईल अॅपवर मराठीतून भरली जात असे. मात्र, १ एप्रिल्पासून केंद्र शासनाच्यावतीने ही माहिती भरण्यासाठी कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये पोषण ट्रॅकर अॅप इंग्रजी व हिंदी भाषेतून देण्यात आले आहे. या अॅपमध्ये माहिती समावेशित केलेल्या लाभार्थींना लाभ दिला जाईल, अशा सूचना दिलेल्या आहेत; परंतु या पोषण ट्रॅकर सॉफ्टवेअरमध्ये मराठी भाषेचा उल्लेख नाही. सर्व माहिती इंग्रजी व हिंदी भाषेत आहे. त्यामुळे ही माहिती भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांची चांगलीच दमछाक होत आहे. काही ठिकाणी उडणारा गोंधळ दूर करण्यासाठी इंग्रजी भाषा येणाऱ्या व्यक्तीचा आधार घेण्याची वेळ अंगणवाडी सेविकांवर आली आहे. ग्रामीण भागात अगोदरच इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने या कामात व्यत्यय येत आहे.
०००
जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र १०७६
अंगणवाडी सेविका १०७६