जिल्ह्यात ‘रातराणी’ पाेहोचलीच नाही; ट्रॅव्हल्स मात्र प्रवाशांनी भरलेल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:40+5:302021-06-16T04:53:40+5:30
जिल्ह्यात सर्वत्र बस सुरू झाल्या असून जिल्हा ठिकाणावरून एकूण ४५ बस धावत आहेत. यामध्ये १२ बस या लांब पल्ल्याच्या ...
जिल्ह्यात सर्वत्र बस सुरू झाल्या असून जिल्हा ठिकाणावरून एकूण ४५ बस धावत आहेत. यामध्ये १२ बस या लांब पल्ल्याच्या आहेत. ज्यामध्ये नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, हिंगाेली या माेठ्या शहरांचा समावेश आहे. तर उर्वरित बस या जिल्हांतर्गत धावत आहेत. रातराणी बस सुरू न झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे; परंतु रातराणी बस सुरू करण्याच्या वरिष्ठांकडून सूचनाच प्राप्त न झाल्याने या बस बंद असल्याचे आगारप्रमुखांकडून सांगण्यात आले. बसपेक्षा ट्रॅव्हल्सच्या बसना आरामदायक प्रवासामुळे पसंती दिसून येत आहे. वाशिम आगारातून धावत असलेल्या लांब पल्ल्याच्या बसपैकी केवळ अकाेला व अमरावती या बसना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून इतर ठिकाणच्या बसमध्ये अद्याप पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी संख्या दिसून येत नाही.
-------------
अकाेला, अमरावती मार्गांवर गर्दी
वाशिम आगारातून नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, शिर्डी, अकाेला, हिंगाेलीसह जिल्ह्यातील तालुका व माेठ्या गावांमध्ये बस सुरू आहेत. या बसपैकी लांब पल्ल्याच्या व जिल्ह्याबाहेर धावत असलेल्या गाड्यांमध्ये केवळ अमरावती व अकाेला मार्गावर प्रवासी असल्याची माहिती वाशिम आगार व्यवस्थापकाकडून देण्यात आली.
------------
ट्रॅव्हल्सचे तिकीट जास्त, तरीही गर्दी
वाशिम शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असताना अद्याप येथून रातराणी बस सुरू झाल्या नसल्या तरी शहरातून ट्रव्हल्सच्या लक्झरी बस माेठ्या प्रमाणात धावताना दिसून येत आहेत. बस आगाराच्या गाडीपेक्षा या ट्रॅव्हल्सची तिकिटे जास्त असूनही प्रवासी याला प्राधान्य देताना दिसून येत आहेत.
एस.टी. आगारापेक्षा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने प्रवास सुखदायक असल्याने ट्रव्हल्सने प्रवासी जाणे पसंत करीत असल्याचे सांगितले. बसची वेळही निर्धारित असून ट्रॅव्हल्स दर दाेन तासाने काेणत्याही मार्गावर मिळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
लांब पल्ल्याच्या बसना अजून पाहिजे तसा प्रतिसाद दिसनू येत नसल्याने रातराणी बस बंद असून प्रवासी संख्या वाढल्यानंतर बस सुरू करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले.
-----------
वाशिम आगारात एकूण ४५ बस धावत आहेत. यामध्ये काही परजिल्ह्यात तर काही जिल्ह्यात सुरू आहेत. रातराणी बस सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांकडून अद्याप सूचना मिळाल्या नसल्याने त्या बंद आहेत. सूचना प्राप्त झाल्यावर त्या सुरू करण्यात येतील. या महिन्याच्या अखेरीस या बस सुरू हाेण्याची शक्यता आहे. तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या रातराणी बससुद्धा वाशिम शहराच्या ठिकाणी सुरू झालेल्या नाहीत. वाशिम आगारात एकूण १०२ चालक असून ११८ वाहक कार्यरत आहेत. त्यांच्याद्वारे प्रवाशांना सेवा पुरविली जात आहे.
- विनाेद इलामे
आगार व्यवस्थापक, वाशिम