वाशीमच्या गुरुवार बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:29+5:302021-04-23T04:43:29+5:30
वाशीम : वाशीम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही, गुरुवार आठवडी बाजारात २२ एप्रिल रोजी नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे ...
वाशीम : वाशीम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही, गुरुवार आठवडी बाजारात २२ एप्रिल रोजी नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. कोणत्याही प्रकारे फिजिकल डिस्टन्सिंग नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाशीम शहरासह तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. भाजीबाजारात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून पाटणी चौकस्थित भाजीबाजार बंद करून अन्यत्र काही ठिकाणी स्वतंत्रपणे भाजीबाजार भरविण्यात येत आहे. शहरातील जुनी नगर परिषद कार्यालयानजीकच्या गुरुवार बाजारात दर आठवड्याला भाजीबाजार भरतो. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे कुठेही गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करीत नागरिक हे भाजीबाजारातही गर्दी करीत असल्याचे गुरुवारी दिसून आले. संचारबंदी नियमांचे पालन न करणाऱ्या, गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.