२० हजार लोकसंख्येच्या शिरपूरात ‘क्वारंटीन’ची सोय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:04 PM2020-05-18T17:04:58+5:302020-05-18T17:05:06+5:30
‘होम क्वारंटीन’ केलेले अनेकजण गावात मुक्त संचार करित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्याने सर्वत्र हाहाकार माजला असताना मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक २० हजार लोकसंख्येच्या शिरपूरात मात्र परराज्य, अन्य जिल्ह्यांमधून येणाºया लोकांना १४ दिवस जिल्हा परिषद शाळा किंवा इतर सुरक्षित ठिकाणी ‘क्वारंटीन’ करण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. ‘होम क्वारंटीन’ केलेले अनेकजण गावात मुक्त संचार करित आहेत. या गंभीर प्रकारामुळे गावकरी दहशतीत वावरत आहेत.
पुणे, मुंबई, औरंगाबाद यासारख्या महानगरांसह परराज्यांमधून गावी परतणारे कामगार, मजूरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. संबंधितांपैकी कुणाला कोरोना विषाणूची लागण झालेली असल्यास संपूर्ण गाव धोक्यात सापडू शकते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधितांची आरोग्य तपासणी करून त्यांना जिल्हा परिषद शाळा किंवा इतर सुरक्षित ठिकाणी किमान १४ दिवसांसाठी ‘क्वारंटीन’ करण्याची सुविधा आतापर्यंत निर्माण करायला हवी होती. प्रत्यक्षात मात्र यापूर्वी परराज्य, अन्य जिल्ह्यांमधून शेकडोजण शिरपूरात दाखल होऊनही ग्रामपंचायतीने विशेष दखल घेतली नाही. त्यातील काही लोकांच्या हातावर ‘होम क्वारंटीन’चे शिक्के मारून त्यांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला; मात्र त्यांच्यापैकी अनेकांचा गावात मुक्त संचार सुरू असताना त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. गावातील आरोग्य सेवक क्षितीज लांडगे, अमर झळके, नामदेव पुंड, ग्रामपंचायत कर्मचारी महाविर बेलोकार, तलाठी एन.व्ही. अंबुलकर, जे.एन. साठे या काही लोकांव्यतिरिक्त कुणीही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी किंवा शिरपूरात दाखल होणाºया मजूरांची आरोग्य तपासणी करून त्यांना ‘क्वारंटीन’ करण्यासाठी कार्य करताना दिसून येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. एकूणच या सर्व परिस्थितीमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी मुंबईहून शिरपूरात दाखल झाले ६० जण; आरोग्य तपासणीसाठी गर्दी!
सोमवार, १८ मे रोजी मुंबई येथून शिरपूरात जवळपास ६० मजूर दाखल झाले. त्यांनी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये आरोग्य तपासणीसाठी मोठी गर्दी केली. यादरम्यान अनेकांना बराचवेळ ताटकळत बसावे लागले. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य तपासणीची व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी होत आहे.