पावसाची विश्रांती, जलसाठय़ातील वाढ नाही
By admin | Published: July 22, 2016 01:03 AM2016-07-22T01:03:37+5:302016-07-22T01:03:37+5:30
वाशिम जिल्ह्यातील १२५ प्रकल्पांत सरासरी २२ टक्के जलसाठा; शेतकरी चिंतातूर, पावसाची प्रतिक्षा.
वाशिम : गत आठ दिवसांपासून थांबलेल्या पावसामुळे जलसाठय़ातील वाढ खुंटली आहे. ४३ लघू प्रकल्पांमध्ये शून्य जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पातील जलसाठय़ांमध्ये किंचितही वाढ झाली नाही. १२५ प्रकल्पांत सरासरी २१.९२ टक्के जलसाठा आहे.
वाशिम जिल्ह्यात एकूण १२५ प्रकल्प असून, यामध्ये तीन मध्यम व १२२ लघू प्रकल्प आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संततधार पाऊस झाल्याने जलाशयांमधील जलसाठय़ात वाढ होईल, अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात समाधानकारक वाढ नाही. आता तर आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने जलाशयांमधील जलसाठय़ाची परिस्थिती चिंताजनक आहे. तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पात केवळ ३.२५ टक्के जलसाठा आहे, तर एकबुर्जी प्रकल्पात १७.६३ आणि अडाण प्रकल्पात २८.८६ टक्के जलसाठा आहे. १२२ लघू प्रकल्पांत सरासरी २१.६१ टक्के जलसाठा आहे.
मानोरा तालुक्यातील २३ लघू प्रकल्पांत सरासरी ६0.१५ टक्के जलसाठा असून, तीन प्रकल्पांत शून्य जलसाठा आहे. कारंजा तालुक्यातील १४ लघू प्रकल्पांत १५.२४ टक्के जलसाठा असून, तीन प्रकल्प शून्यावर आहेत. रिसोड तालुक्यातील १७ लघू प्रकल्पांत सरासरी केवळ १.९0 टक्के जलसाठा १0 प्रकल्प शून्यावर आहेत. मालेगाव तालुक्यातील २२ लघू प्रकल्पांत सरासरी १४.0५ टक्के जलसाठा असून, १२ प्रकल्पात शून्य जलसाठा आहे. वाशिम तालुक्यातील ३१ लघू प्रकल्पांत सरासरी १९.१३ टक्के जलसाठा असून, १२ प्रकल्प शून्यावर आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील १५ लघू प्रकल्पांत सरासरी २१.५५ टक्के जलसाठा असून, तीन प्रकल्प शून्यावर आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात १३५ टक्के पाऊस रिसोड तालुक्यात झाल्याची नोंद आहे. तथापि, रिसोड तालुक्यातील जलाशयांच्या पातळीत केवळ सरासरी १.९0 टक्के जलसाठा आहे. सर्वाधिक जलसाठा मानोरा तालुक्यातील प्रकल्पांमध्ये सरासरी ६0 टक्के आहे.