कशी चालणार 'शिवशाही'? दुरुस्तीसाठी आगारात साहित्यच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 03:30 PM2019-07-31T15:30:35+5:302019-07-31T15:36:18+5:30
शिवशाही बसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी आवश्यक साहित्यच दोन्ही आगारात नाही.
वाशिम : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी शिवशाही बस सुरु केल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड आगारात चार आणि वाशिम आगारात तीन मिळून सात शिवशाही बस सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु या बसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी आवश्यक साहित्यच दोन्ही आगारात नाही. त्यातच प्रतिसाद कमी असल्यामुळे वाशिम आगाराला मिळालेल्या तीनपैकी दोन शिवशाही बस परत पाठविण्यात आल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने साधारण दीड वर्षापूर्वी प्रवाशांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्यभरात शिवशाही बस सुरु केल्या आहेत. सर्वसाधारण बसपेक्षा या बसचे प्रवासभाडेही दीडपट आहे. या बसगाड्यांत व्हिडिओ कोच, वातानुकूलित सुविधेसह इतर काही सुविधा असल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले होते; परंतु या बसमध्ये सद्यस्थितीत वातानकूलनाशिवाय इतर कोणतीही सुविधा दिसत नाही. तथापि, इतर बसगाड्यांपेक्षा या गाड्या आरामदायी असल्याने काही प्रवाशांसाठी फायदेशीरच ठरल्या. तथापि, या बसगाड्यांमध्ये अचानक मोठा बिघाड झाल्यास तो दुरूस्त करण्याची सुविधा रिसोड किंवा वाशिम आगारातही उपलब्ध नाही. त्यामुळे ही बस थेट अकोला येथील विभागीय कार्यालयातच दुरुस्ती पाठवावी लागते. मार्गावर प्रवासादरम्यानच बस बंद पडली की, प्रवाशांचा मोठा खोळंबा होतो आणि साधारण बसमध्ये बसून प्रवाशांना पुढील प्रवास करावा लागतो. यावेळी साधारण बस आणि शिवशाहीच्या भाड्यातील फरकाची रक्कम प्रवाशांना परतही दिली जाते; परंतु नजिकच्या आगारातील साधारण बस येईपर्यंत प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. या कारणांमुळेच शिवशाही बसगाड्या प्रवाशांसाठी सोयीऐवजी अडचणीच्या ठरण्याची शक्यता वाढली असून, असे प्रकार एक दोन वेळा घडलेही आहेत. आता वाशिम आगारातील दोन शिवशाही बस पुरेशा उत्पन्नाअभावी परत पाठविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत रिसोड आगारातून चार आणि वाशिम आगारातून एक अशा पाच बस सुरु असल्या तरी, त्यापासून फारसे उत्पन्नही आगारांना होत नसल्याचे प्राप्त माहितीवरून स्पष्ट होत आहे.
वाशिम आगारात तीन शिवशाही बसगाड्या सुरु केल्या होत्या; परंतु प्रतिसाद न मिळाल्याने दोन बसगाड्या परत पाठविल्या आहेत, तर एक बस अद्याप सुरु आहे. या बसमधील बिघाड दुरुस्तीसाठी आगारात व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु प्रवासादरम्यान मार्गावर मोठा बिघाड होऊन बस बंद पडल्यास. ती दुरुस्तीसाठी विभागीय कार्यशाळेत पाठवावी लागते. तथापि, प्रवाशांना पुढील प्रवासासाठी साधी बस उपलब्ध करून प्रवासभाड्यातील फरकाची रक्कम परत केली जाते.
-विनोद ईलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम
रिसोड आगारात चार शिवशाही बस असून, या चारही बस सद्यस्थितीत सुरू आहेत. मोठा तांत्रिक बिघाड उद्भवल्यास दुरुस्तीसाठी ही बस अकोला येथील विभागीय कार्यशाळेकडे पाठविली जाते. हंगामाच्या दिवसांत चांगले उत्पन्न या बसगाड्यांतून प्राप्त झाले; परंतु सद्यस्थितीत हंगाम नसल्याने फारसे उत्पन्न प्राप्त होत नाही.
-ए. जी. मेहेत्रे, आगार व्यवस्थापक , रिसोड