वाशीम जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश नाही; सीमेवर पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:40 AM2021-04-24T11:40:15+5:302021-04-24T11:40:23+5:30
Police deployed at the washim border : विनापरवाना जिल्ह्यात कुणी प्रवेश करणार नाही, याची दक्षता पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाने घेतल्याचे जिल्हा सीमेवर आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजतापासून जारी केलेल्या नियमाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा सीमेवर ३३ नाकाबंदी तसेच ५८ तपासणी नाके उभारून विनापरवाना जिल्ह्यात कुणी प्रवेश करणार नाही, याची दक्षता पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाने घेतल्याचे जिल्हा सीमेवर आढळून आले.
राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या संचारबंदीसह इतर निर्बंध आणखी कठोर करण्याचे बुधवारी जाहीर केले होते. गुरुवार, २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतापासून नवीन नियमावली लागू झाली असून, वाशीम जिल्ह्यातही पहिल्याच दिवशी शुक्रवारी या नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली. जिल्हाबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी म्हणून जिल्ह्याच्याच सीमेवर ३३ नाकाबंदी तसेच ५८ तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी करण्यात आली. कारंजा तालुक्याच्या सीमेवर सोमठाणा, महागाव, खेर्डा, धनज, दोनद अशा पाच ठिकाणी शुक्रवारी वाहनांची तपासणी करण्यात आली. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा फाटा येथील चेकपोस्टजवळ अकोला जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली.
रिसोड तालुक्यात सेनगावकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली तर, मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील चेकपोस्टजवळ बुलडाणा, अकोला जिल्ह्याकडून येणाऱ्या वाहनांची तसेच मानोरा तालुक्यातील चिस्तळा फाटा येथे यवतमाळकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. वाशीम तालुक्यातील राजगाव-कनेरगाव दरम्यानच्या चेकपोस्टवर मराठवाड्यातून विनापरवाना वाहने जिल्ह्यात येणार नाहीत, याची कसून चौकशी करण्यात आली. अत्यावश्यक कारण आणि परवाना असेल तरच वाहनांना जिल्ह्यात प्रवेश असून, वाहन, बसेसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आहेत का, मास्कचा वापर आहे की नाही, याचीही तपासणी पहिल्या दिवशी करण्यात आली.
जिल्हाबंदी निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जिल्हा सीमेवर चेकपोस्ट तसेच तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे निर्देश दिले असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
-वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम