वर्षभरानंतर जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:08+5:302021-08-12T04:46:08+5:30
वाशिम : तब्बल एका वर्षानंतर, मंगळवारी जिल्ह्यात एकाचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, ही बाब जिल्हावासीयांसाठी मोठी दिलासादायक ...
वाशिम : तब्बल एका वर्षानंतर, मंगळवारी जिल्ह्यात एकाचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, ही बाब जिल्हावासीयांसाठी मोठी दिलासादायक मानली जात आहे. दोघाजणांनी कोरोनावर मात केली असून, १५ रुग्ण सक्रिय (अॅक्टिव्ह) आहेत.
जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. ऑगस्ट २०२० पासून प्रत्येक दिवशी जिल्ह्यात कमी-अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. गत एका वर्षात पहिल्यांदाच मंगळवारी जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण कोरोनाबाधित रुग्ण ७१४३ होते; तर एकूण १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारांवर रुग्ण आढळून आले. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने घट येत असून, मंगळवारी जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही, ही बाब जिल्हावासीयांसाठी मोठी दिलासादायक मानली जात आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ४१६७८ रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी ४१०२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंंत ६३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१५ सक्रिय रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही. दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृह विलगीकरणात असे एकूण १५ रुग्ण सक्रिय आहेत.