वाशिम जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 11:20 AM2021-08-04T11:20:07+5:302021-08-04T11:20:15+5:30
Mucomycosis in Washim district : एकही रुग्ण आढळला नसल्याने जिल्हा म्युकरमायकोसिसमुक्त झाला आहे.
वाशिम : पोस्ट कोविडनंतर जिल्ह्यातही म्युकरमायकोसिसचे (बुरशीजन्य आजार) २६ रुग्ण आढळून आले होते. गत १५ दिवसापासून जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण आढळला नसल्याने जिल्हा म्युकरमायकोसिसमुक्त झाला आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोना आजारातून बरे होऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार आढळून आला. हा आजार बुरशी (फंगल इन्फेक्शन) या जंतूंमुळे होतो. जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराने ११ मे रोजी पहिला बळी घेतला होता. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती काही कारणाने कमी झालेली असेल, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असेल तर त्यांच्यामध्ये बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. कोरोनानंतर डोळा, दात, मुख, तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, सायनस रक्त संचय, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्याच्या वर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे आदी लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण २६ रुग्ण आढळून आले. त्यात चार जणांचा मृत्यू झाला हाेता.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे २६ रुग्ण आढळले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. गत १५ दिवसांपासून म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण आढळून आला नाही. सध्या तरी जिल्हा म्युकरमायकोसिसमुक्त आहे.
- डॉ. मधुकर राठोड जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम