वाशिममध्ये दोन तलाठ्यांवर प्राणघातक हल्ला
By admin | Published: January 15, 2017 07:12 PM2017-01-15T19:12:59+5:302017-01-15T19:12:59+5:30
वाशिम जिल्ह्यातील धनज बु. पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वाढोणा-तारखेडा शेतशिवारात शासकीय कामात अडथळा
Next
>ऑनलाइन लोकमत
धनज बु. (वाशिम), दि. 15 - वाशिम जिल्ह्यातील धनज बु. पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वाढोणा-तारखेडा शेतशिवारात शासकीय कामात अडथळा निर्माण करून दोन तलाठ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी श्रावण अमोल वडलावे याच्याविरूद्ध १५ जानेवारीला विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
धनज बु. (वाशिम), दि. 15 - वाशिम जिल्ह्यातील धनज बु. पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वाढोणा-तारखेडा शेतशिवारात शासकीय कामात अडथळा निर्माण करून दोन तलाठ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी श्रावण अमोल वडलावे याच्याविरूद्ध १५ जानेवारीला विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात तारखेडा येथील तलाठी बबन किसन भारती यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की १४ जानेवारीला दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास मी आणि माझे सहकारी तथा नारेगांवचे तलाठी रवींद्र गजानन कोरडे यांनी दैनंदिन कार्याचा भाग म्हणून ‘पेट्रोलिंग’ केली. यादरम्यान वाढोणा ते तारखेडा रोडवर मारोती शेंडे यांच्या शेतानजिक वाढोण्याकडून तारखेडा येथे जात असलेला एक हिरव्या रंगाचा जॉनडिअर कंपनीचा विना क्रमांक ट्रॅक्टर आढळून आला. त्यात बेकायदेशीरपणे डब्बर व मुरूमाची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ट्रॅक्टर चालक अमोल वडलावे यास परवाना मागितला असता, त्याने आम्हा दोघांच्या अंगावर हेतुपुरस्सरपणे ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तलाठी कोरडे यांना जबर मार लागल्याचे तलाठी भारती यांनी नमूद केले आहे.
एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही तर ट्रॅक्टर चालक अमोल वडलावे याने त्याचे नातेवाईक प्रविण ज्ञानोबा वडलावे, जयराम ज्ञानोबा वडलावे यांना फोन लावून घटनास्थळी बोलावून घेतले. या लोकांनी देखील आपणास व कोरडे यांना शिविगाळ आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.
तलाठी भारती यांच्या अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर कलम ३०७, ३५३, ३७९, ५०४, १८६, ३४ भादंविनुसार गुन्ह्याची नोंद केली. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल गुहे करित आहेत.