वाशिम जिल्ह्यातील ६४३ शाळा राहणार मुख्याध्यापकांविना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 02:12 PM2019-06-25T14:12:02+5:302019-06-25T14:12:32+5:30
२०१९-२० च्या शैक्षणिक सत्रात केवळ १ ते ५ च्या मर्यादेत शिक्षक कार्यरत राहणार असून अधिकृत मुख्याध्यापक मिळणार नसल्याची नामुष्की ओढवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येत्या २६ जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अपेक्षित प्रमाणात पटसंख्या ठेवण्यात यंदाही शिक्षण विभाग अपयशी ठरला आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील ७७५ प्राथमिक शाळांपैकी तब्बल ६४३ शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी असल्याने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अन्वये अशा सर्व शाळा २०१९-२० या शैक्षणिक सत्रात अधिकृत मुख्याध्यापकांविना असणार आहेत.
जिल्हा परिषद शाळांमध्ये पुर्वी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत पूर्वप्राथमिक, पाचवी ते सातवी प्राथमिक आणि इयत्ता आठवी ते दहावी माध्यमिक असे स्वरूप होते. त्यात शालेय शिक्षण विभागाने मध्यंतरी बदल करून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांना पाचवीचा वर्ग जोडला आणि आठवी ते दहावीच्या शाळांना सहावीपासूनचे वर्ग जोडण्यात आले. काही ठिकाणी तर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना आठवीचा वर्ग जोडला गेला. या सर्व गदारोळात अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. त्याचा थेट परिणाम ज्ञानार्जनावर होवून बहुतांश शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावण्यास ही बाब प्रामुख्याने कारणीभूत ठरली. त्यामुळेच वर्षागणिक पटसंख्या घटत चालल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ७७५ प्राथमिक शाळा असून त्यातील तब्बल ६४३ शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे. यातीलच ३३६ शाळांना ५० ची पटसंख्याही गाठता आलेली नाही. काही शाळांची तर अत्यंत दयनिय अवस्था असून १५ पेक्षाही कमी पटसंख्या असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अन्वये अशा सर्व शाळांवर २०१९-२० च्या शैक्षणिक सत्रात केवळ १ ते ५ च्या मर्यादेत शिक्षक कार्यरत राहणार असून अधिकृत मुख्याध्यापक मिळणार नसल्याची नामुष्की ओढवली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा सर्वंकष प्रयत्न केले जात आहे; मात्र दर्जेदार शिक्षण मिळूनही ग्रामीण भागातील अधिकांश पालकांनी जिल्हा परिषद शाळांकडे पाठ फिरवल्यानेच पटसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.
- अंबादास मानकर
प्राथमिक शिक्षणाधिकारी, वाशिम