हातमागावरील घोंगडीची कला त्यांनी ठेवली जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 02:10 PM2018-05-27T14:10:18+5:302018-05-27T14:10:18+5:30

४० वर्षांपासून व्यवसाय: मंगरुळपीर तालुक्यातील पांडुरंग कोल्हेंचा उपक्रम 

They kept the art alive of handmade Natural Thermal Warmer | हातमागावरील घोंगडीची कला त्यांनी ठेवली जिवंत

हातमागावरील घोंगडीची कला त्यांनी ठेवली जिवंत

Next

-गोपाल माचलकर  
पार्डी ताड: मेंढीच्या लोकरा पासून हातमागावर बनणारी घोंगडी आता कालबाह्य झाली असली तरी, मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ६८ वर्षीय पांडुरंग कोल्हे यांनी मात्र गेल्या ४० वर्षांपासून ही कला जिवंत ठेवली आहे. या व्यवसायावर उदरनिर्वाह होणे कठीण असले तरी, कला जिवंत राहावी म्हणूनच ते हा व्यवसाय करीत असून, याचे प्रशिक्षण इतरांनीही घ्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. हातमागावर घोंगड्या बनविणे हा पार्डी ताड येथील पांडुरंग कोल्हे यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. गेली ४० वर्षांपासून ते हा व्यवसाय करीत आहेत. यासाठी मेंढीचे लोकर अर्थात केस आणण्यासाठी त्यांना परिश्रम करावे लागतात. या लोकरीपासून घोंगडीसाठी धागा तयार करण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो आणि अखंडा धागा बनल्यानंतर त्यापासून घोंगडी तयार करण्यासाठी दोन दिवस लागतात.

अर्थात एका घोंगडीसाठी त्यांना आठ दिवस परिश्रम करावे लागतात. धागा तयार केल्यानंतर तो चिंचेच्या पाण्यात भिजवून उन्हात वाळविला जातो. त्यानंतर हा धागा सुरळीत करण्यासाठी फणीने विंचरले जाते. मगच धागा हातमागावर उभा, आडवा लावून त्यापासून घोंगडी बनविली जाते. मेंढीच्या लोकरापासून बनलेली घोंगडी उबदार असल्याने शेतकरी वर्गात पूर्वी या घोंगडीला मोठी मागणी होती; परंतु आधुनिक काळात उबदार शाली आणि चादरींची निर्मिती झाल्यानंतर या घोंगडीची मागणी घटली आहे. त्यामुळे हातमागावर घोंगडी बनविणा-या विणकरांची संख्याही आता बोटावर मोजण्याएवढीच उरली आहे; पांडुरंग कोल्हे यांनी मात्र ४० वर्षांपासून ही कला जपली आहे. त्यांनी बनविलेल्या एका घोंगडीचे बाजार मुल्य १३०० रुपये असले तरी, त्यामधून त्यांची मिळकत मात्र अगदीच नगण्य आहे. मंगरुळपीर तालुक्यात हा व्यवसाय करणारे पांडुरंग कोल्हे हे एकमेव असले तरी, शासनाकडून मात्र त्यांच्या कलेची उपेक्षाच होत आहे. 
 
शासनाने कलेची जोपासना करावी ! 
मेंढ्यांच्या लोकरापासून घोंगड्या बनविण्याची कला ही पारंपरिक आणि अनन्य साधारण असून, पर्यावरणपुरक अशीच आहे. या कलेची जोपासणा करून विणकरांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास हातमागावर घोंगडी विणण्याचा व्यवसाय वृद्धीगंत होऊन लोकांना रोजगाराचा नवा पर्याय मिळेल. त्यामुळे शासनाने या कलेचा विकास करून ती जोपासण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पांडुरंग कोल्हे यांनी केली आहे.

Web Title: They kept the art alive of handmade Natural Thermal Warmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.