चोरट्याने एटीएम फोडले; १३.३० लाख लंपास, सुरक्षा रक्षकाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:15 PM2019-05-09T18:15:18+5:302019-05-09T18:16:25+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी (रोड) येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्याने १३ लाख ३० हजार ३०० रुपये लंपास केल्याची घटना ८ मे रोजी रात्री दरम्यान घडली. गतवर्षीसुद्धा याच बँकेच्या एटीएमवर चोरट्यानी डल्ला मारला होता, हे विशेष.
मंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी (रोड) येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्याने १३ लाख ३० हजार ३०० रुपये लंपास केल्याची घटना ८ मे रोजी रात्री दरम्यान घडली. गतवर्षीसुद्धा याच बँकेच्या एटीएमवर चोरट्यानी डल्ला मारला होता, हे विशेष.
चॅनल मॅनेजर राहुल वासुदेवराव गहुले (२८) रा. कौलखेड अकोला यांच्या फिर्यादीनुसार ते ईपीएस मुख्यालय मुंबई या कंपनीत ‘चॅनल मॅनेजर’ या पदावर काम पाहतात. शिवणी रोड येथील एसबीआयच्या एटीएमचे सुद्धा काम त्यांच्याकडे असून ९ मे रोजी सकाळी अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडले, अशी माहिती एटीएम जागेचे मालक अनिल चव्हाण यांनी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
अज्ञात चोरट्याने गॅस कटरने एटीएम मशीन कापून त्यातील १३ लाख ३० हजार ३०० रुपये रोख चोरून नेले व एटीएम मशीनचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान केले. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३८०, ४२७ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे, सहायक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मोरे व पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते.
गतवर्षीसुद्धा याच ठिकाणचे एटीएम चोरट्यांनी फोडले होते. याठिकाणी बँकेने सुरक्षा रक्षक ठेवला नसल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करीत आहेत.