‘टीएचओ’चे अविश्रांत परिश्रम, वर्षभरात १३२० शस्त्रक्रिया; वरिष्ठांकडून सन्मान
By सुनील काकडे | Published: February 22, 2024 02:38 PM2024-02-22T14:38:03+5:302024-02-22T14:39:57+5:30
‘सीईओं’कडून दखल : प्रमाणपत्राने सन्मान
सुनील काकडे
वाशिम : दैनंदिन जबाबदारी पार पाडण्यासह २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जावून रिसोड येथील तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रामहरी बेले यांनी वर्षभरात १३२० कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या या अतुलनिय कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी २२ फेब्रुवारी रोजी त्यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. विजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गावखेड्यांमध्ये कार्यान्वित प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. आजही अनेक गावांमध्ये खासगी आरोग्य सेवा उपलब्ध नाही. असली तरी आर्थिक स्थिती बेताची राहत असल्याने ते अनेकांना परवडत नाही, अशा लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे संजिवनी ठरत आहेत. अशाच २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डाॅ. बेले यांनी तब्बल १३२० कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. त्यांच्या या कार्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी डॉ. बेले यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानत्केला.
जिल्हाभरात ३१२३ शस्त्रक्रिया; डाॅ. बेलेंचा वाटा ४० टक्के!
जिल्हा आरोग्य यंत्रणा राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेमध्ये जिल्ह्याचे (ग्रामीण) एकूण उद्दिष्ट ५६९८ आहे. त्यापैकी आतापर्यंत ३१२३ शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून ५५ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यापैकी डॉ. बेले यांनी तब्बल १३२० शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.