परजिल्ह्यातून परतणाऱ्यांना राहावे लागणार २० दिवस घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:24 AM2020-04-21T10:24:41+5:302020-04-21T10:24:49+5:30
परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. अत्यावश्यक कामासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी रितसर परवानगी घेऊन परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांविरूद्ध कडक कारवाई होणार आहे; याशिवाय तालुका किंवा जिल्हास्तरावर आयसोलेशन कक्षात २० दिवसात संबंधितांना भरती केले जाणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येते. वाशिम जिल्ह्यात एका रुग्णाचा अपवाद वगळता तुर्तास तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि, संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे तर काही प्र्रतिबंधात्मक उपाययोजना नव्याने अंमलात आणल्या जात आहेत. अत्यावश्यक कामासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी परजिल्ह्यात जाण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. या परवानगीनंतर रितसर प्रवास पास, त्यावर नमूद कारण आणि व्यक्तींची संख्या, ठिकाणाचे नाव राहणार असून, त्याची एक प्रत संबंधित तालुक्याचे तहसिलदार आणि आरोग्य अधिकाºयांकडे दिली जाणार आहे. या व्यक्तींवर तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाचा वॉच राहणार आहे. परजिल्ह्यात जाणे आणि परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात परतल्यानंतर संबंधितांना पुढील २० दिवस घरातच विलगीकरण म्हणून राहावे लागणार आहे. या २० दिवसात संबंधित इसम हा घराबाहेर फिरताना दिसला तर साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणे आणि तालुका किंवा जिल्हास्तरावर आयसोलेशन कक्षात २० दिवसात त्याला भरती केले जाणार आहे.
तहसिलदार, आरोग्य अधिकाºयांचा वॉच
अत्यावश्यक काम तसेच वैद्यकीय उपचारासाठी परजिल्ह्यात गेल्यानंतर परत स्वजिल्ह्यात आल्यानंतर संबंधितांवर तहसिलदार तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांचे २० दिवस विशेष लक्ष राहणार आहे. परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात आल्यानंतर सर्व संबंधितांची आरोग्य विभागातर्फे प्राथमिक स्वरुपात तपासणी केली जाते. संबंधित इसमांच्या हातावर ‘होम क्वारेंटीन’चे शिक्के मारले जातात. २० दिवस संबंधित नागरिकांचे त्याच्या घरातच विलगीकरण केले जाते. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार आहे.
शासकीय इमारतीत पर्यायी व्यवस्था
दरम्यान, विनापरवानगी जिल्ह्यातील कोणत्याही गावात परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींपासून कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी त्या व्यक्तीची राहण्याची व्यवस्था ही संबंधित गावातील जिल्हा परिषदेची शाळा किंवा अन्य शासकीय इमारतीत केली जाणार आहे. यासाठी पांघरून, पिण्याचे व वापरण्याचे पाणी, भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार आहे. शाळेत वीज, स्वच्छता, वापरण्याचे पाणी याबाबतची व्यवस्था संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे.