लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:27 AM2021-07-21T04:27:29+5:302021-07-21T04:27:29+5:30
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. लस घेतल्यानंतरही यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोरोना चाचणी आवश्यक ...
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. लस घेतल्यानंतरही यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोरोना चाचणी आवश्यक होती. आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. लसीचा दुसरा डोस घेऊन १५ दिवस झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे; मात्र मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे व वारंवार हात धुणे आदी कोरोना-१९ नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले.
०००
‘निगेटिव्ह’ अहवाल वैधतेचा कालावधी वाढला
लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या इतर सर्व व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचणीच्या ‘निगेटिव्ह’ अहवाल वैधतेचा कालावधी ४८ तासांचा होता. आता यामध्ये वाढ करण्यात आली. ४८ तासांऐवजी ७२ तासांचा कालावधी करण्यात आला आहे.