ई-क्लास जमिनीवरून हजारो ब्रास मुरुमाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:01 PM2019-07-02T15:01:15+5:302019-07-02T15:01:48+5:30
शिरपूर जैन (वाशिम): येथील विविध भागातून गौण खनिजाची (मुरुम) मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): येथील विविध भागातून गौण खनिजाची (मुरुम) मोठ्या प्रमाणात चोरी झाली असून, यात हजारो ब्रास मुरुम चोरी गेला असल्याचे निदर्शनास दिसून येत आहे. चोरी गेलेल्या या गौणखनिजापोटी स्वामित्व धन (रॉयल्टी) म्हणून लाखो रुपयांचा चुना शासनाला लागला आहे. याकडे महसूल विभागाचे तलाठी व मंडळाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. मागील दोन वर्षाच्या काळात शिरपूर येथील वाघी रस्त्यावरील ई-क्लास जमीन , तसेच करंजी शिवारातील ई-क्लास जमिनीवर गौण खनिज माफियांनी मोठ मोठे खड्डे खोदून मुरमाची चोरी केली आहे. रविवारसह सुटीच्या इतर दिवसांत गौणखनिजाची चोरी केली जाते. दोन वर्षाच्या काळात जवळपास पाच हजार ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. गावात महसूल विभागाचे मंडल अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय आहे. या गावात एकूण तीन तलाठी व एक मंडळाधिकारी कार्यरत आहेत; मात्र ते मुरुम चोरीच्या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत ते उदासीन आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या मुरूम चोरीला मंडळ अधिकारी जबाबदार असल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी त्यांना याबाबत जाब विचारणे आवश्यक आहे. तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकाºयांनी शिरपूर येथे येऊन ई-क्लास जमिनीची पाहणी करुन ई क्लास जमिनीमध्ये पडलेल्या खड्ड्यांचे मोजमाप केल्यास मोठ्या प्रमाणात झालेल्या मुरूम चोरीची माहिती समोर येईल.