वाशिमात हजारो अनुयायांनी केलं महामानवाला अभिवादन, पहाटेच्या सुमारास ‘कॅन्डल मार्च’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 02:58 PM2017-12-06T14:58:20+5:302017-12-06T14:58:29+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो अनुयायांनी वाशिम जिल्ह्यात बाबासाहेबांना अभिवादन केले.
वाशिम - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो अनुयायांनी वाशिम जिल्ह्यात बाबासाहेबांना अभिवादन केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी वाशिम येथे सकाळी ५.३० वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘कॅन्डल मार्च’ व अभिवादन कार्यक्रम पार पडला. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास शहराच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव व आंबेडकरी अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आले. प्रत्येकजण हातात ‘कॅण्डल’ घेऊन चौकात आल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत ‘कॅण्डल’ लावण्यात आली. त्यानंतर सामुहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील, त्रिशरण ग्रहण करण्यात आले. भन्ते प्रज्ञापाल यांच्यावतीने भीमस्तूती, धम्मपालन गाथा व सामूहिक वंदना घेतली. यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅक्टिवा फोरम, संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ, मंगलमैत्री महिला मंडळ, जम्बु दीप संघ, डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटना, पंचशील संघ, भीम टायगर संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटना, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आंबेडकरी अनुयायी व समाजबांधवांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.