हजारो दिव्यांनी झगमगला ऐतिहासिक देवतलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:23 PM2018-05-18T15:23:31+5:302018-05-18T15:23:31+5:30
वाशिम: शहरातील ऐतिहासिक देवतलाव गुरुवारी रात्री हजारो दिव्यांनी झगमगल्याचे विहंगम चित्र वाशिमकरांना पाहायला मिळाले
वाशिम: शहरातील ऐतिहासिक देवतलाव गुरुवारी रात्री हजारो दिव्यांनी झगमगल्याचे विहंगम चित्र वाशिमकरांना पाहायला मिळाले. या तलावाच्या पुनरुज्जीवन कार्यात हजारो लोक सहभागी होत आहेत. या कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी ‘मी वाशिमकर’ संघटनेने देवतलाव महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवांतर्गतच विश्वमांगल्य सभेच्या महिलांनी देवतलावाच्या चारही बाजूला दिव्यांची आरास लावली होती.
वाशिमकरांचे आराध्य दैवत श्री बालासाहेब संस्थाननजिक असलेल्या देव तलावाच्या स्वच्छता आणि गाळ उपसण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून, ‘मी वाशिमकर’ संघटनेतर्फे देवतलाव महोत्सवाला १६ मे पासुन प्रारंभ झाला २० मेपर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहे. वाशिमचा देव तलाव श्री बालासाहेब मंदिराचे निर्माणाच्या वेळीच बांधला गेला होता. हा तलाव वाशिमकरांसाठी ऐतिहासिक तलाव असून, गेल्या कित्येक वर्षांपासून वाशिमकरांच्या पाण्याच्या गरजा भागवित आहे. तथापि, गेल्या काही वर्षांपासून या ऐतिहासिक तलावाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तलाव अगदी कोरडा पडला होता. त्यामुळे भूजल पातळीवर परिणाम झाला आणि त्याची जाणीव वाशिमकरांना होऊ लागली. ही समस्या लक्षात घेऊन मी वाशिमकर संघटनेने या तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी तलावाच्या पुनरुज्जीवनात सहकार्य करण्यासाठी तमाम वाशिमकरांना हाक दिली आणि त्यांच्या हाकेला हजारो नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिकांचा उस्फूर्त सहभाग आणि तलावाच्या झपाटून होत असलेल्या कामाचा उत्सव म्हणून ‘मी वाशिमकर’ संघटनेच्यावतीने देवतलाव महोत्सवाला १६ मे रोजी प्रारंभ करण्यात आला. या महोत्सवात विश्वमांगल्य सभेच्या महिलांनी सहभाग घेऊन देवतलावाच्या पुनरुज्जीवनासाठी श्रमदान केलेच शिवाय देव तलावाच्या घाटावर रात्रीच्यावेळी हजारो दिव्यांची आरासच मांडली. हजारो दिव्यांच्या प्रकाशामुळे झगमगलेल्या या तलावाचे रुप नजरेत भरणारे होते. १६ मे पासून प्रारंभ झालेल्या अधिकमासाचे स्वागत म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विश्वमांगल्य सभेच्या समस्त महिला उपस्थित होत्या. सर्व महिलांनी देव तलावावर सुरू असलेल्या आरतीमध्येही सहभाग घेतला.