दुचाकी चोरीप्रकरणी तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:39+5:302021-01-14T04:33:39+5:30
प्रदीप रामकृष्ण पोहाने (वय ४४, रा. कवठळ, ता. मंगरूळपीर) यांनी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास (एम.एच. ...
प्रदीप रामकृष्ण पोहाने (वय ४४, रा. कवठळ, ता. मंगरूळपीर) यांनी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास (एम.एच. ३७ यु ३०३३) दुचाकी तहसील कार्यालय मंगरुळपीर परिसरात उभी करून कामानिमित्त कार्यालयात गेले होते. कामकाज आटोपून घटनास्थळी आले असता, दुचाकी आढळून आली नाही. शोधाशोध केल्यानंतर दुचाकी आढळून न आल्याने याप्रकरणी मंगरुळपीर पोलिसांनी १ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवून या घटनेचा छडा लावण्यात यश मिळविले. गुप्त माहितीच्या आधारे तांदळी शेवई येथील मंगेश विष्णू सावंत हा आरोपी असल्याचे समोर आल्याने सापळा रचून वाशिम येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात मंगेशसह साथीदार मनोज संजय आवारे (रा. भटउमरा) या दोन आरोपीला ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, मंगरुळपीर येथून दुचाकी चोरल्याची कबुली सावंत याने दिली. चोरून आणलेली दुचाकी राहुल दिलीप सुरवाडे (रा. वाशिम) याच्याकडे ठेवल्याची कबुली दिल्यानंतर सुरवाडे याच्याकडून दुचाकी ताब्यात घेतली. या तीनही आरोपींची कसून चाैकशी केली असता एका महिन्यापूर्वी वाशिम येथील बसस्थानक येथून एका दुचाकीची चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. उपरोक्त प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगेश विष्णू सावंत, मनोज आवारे व राहुल सुरवाडे यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले असून, पुढील कार्यवाहीसाठी मंगरुळपीर पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे व चमूने पार पाडली.