वाटमारी प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद!
By admin | Published: June 2, 2017 01:29 AM2017-06-02T01:29:30+5:302017-06-02T01:29:30+5:30
लाखोचा मुद्देमाल जप्त : तिघेही वाशिम शहरातीलच
वाशिम : ग्रामीण व शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींचा पोलिसांनी छडा लावला असून, तिघांनाही १ जून रोजी जेरबंद करण्यात आले.
वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील तामसाळा फाट्यावर गोकुलचंद सिंगरोळ यांची दुचाकी अडवून अज्ञात तिघांनी रोख ११५० रूपये व दोन हजार रूपये किमतीचा मोबाइल जबरीने चोरून नेला होता. त्यानंतर वाशिम शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केकतउमरा मार्गावरील निमजगा परिसरात तोंडगावच्या गोटे नामक दोन युवकांची दुचाकी अडवून त्यांच्याकडून मोबाइल व रोख रक्कम हिसकावून नेली होती. विळेगाव येथील काळंबांडे नामक शिक्षकाला अडवून ३५ हजार रूपये हिसकावून नेले होते. सातत्याने घडणाऱ्या या वाटमारीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमक्ष उभे ठाकले होते. दरम्यान, ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी विशेष पथक नेमून मोबाइल लोकेशनवरून आरोपींचा शोध लावला. यामध्ये पोलिसांनी संघपाल भारत कांबळे (वय १९), राहुल रूपेश वाघमारे (वय १८) व सचिन दिलीप रसाळ (वय १८, तिघेही रा. भीम नगर वाशिम) या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, वाटमारीच्या घटनेतील पाच मोबाइल व एक दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले.