कारंजात साडेतीन लाखांची घरफोडी
By admin | Published: October 2, 2015 02:15 AM2015-10-02T02:15:04+5:302015-10-02T02:15:04+5:30
काण्णव प्लॉट परिसरातील घटना; अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.
कारंजा लाड (जि. वाशिम): शहरातील काण्णव प्लॉट परिसरातील एका कुलूपबंद घरात शिरून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३ लाख ५१ हजार २00 रुपयांची धाडसी चोरी केल्याची घटना गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास निदशर्नास आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक काण्णव प्लॉट येथील रहिवासी धरमचंद मोतीलाल जैन (५0) हे पत्नी उज्जवलासह २२ सप्टेंबर रोजी पुणे येथे मुलाकडे गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप फोडून आत प्रवेश केला व तीन खोल्यांमधील लाकडी कपाटातील ५0 हजार रूपये किमतीचे २0 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्न , दहा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजन असलेले कानातील सोन्याचे झुमके, एक लाख रुपये किमतीच्या चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, १ हजार २00 रुपये किमतीचा चांदीचा हळदी-कुंकवाचा करंडा, १५0 ग्रॅम वजनाचे ५७ हजार रुपये किमतीचे चांदीचे १५ शिक्के, ७६ हजार रुपये किमतीचे दोन चांदीचे ताट, ५७ हजार रुपये किमतीचे चांदीचे पायदान असे मिळून ३ लाख ५१ हजार २00 रुपयांचे साहित्य लंपास केले. गुरुवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास जैन कुटुंबीय आपल्या निवासस्थानी पोहोचल्यावर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी वाशिम येथील श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते; पण चोरीचा सुगावा लागला नाही. वाशिम येथील गुन्हे अन्वेषण विभागाने घरातील साहित्याला लागलेल्या चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी धरमचंद जैन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारंजा शहरात चोर्यांचे प्रमाण वाढले असून, या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार त्यावरून लक्षात येते. चोरी झाली त्या ठिकाणी काही अंतरावर भारतीय स्टेट बॅक, कॅनडा बॅक, अँक्सिस बॅक तसेच कारंजा नागरी पतसंस्था तसेच एटीएम आहे. या महत्त्वाच्या परिसरात धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये दिवसभर चर्चा होती. या चोर्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.