लाचप्रकरणी तीन लेखा परीक्षक जेरबंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:52 PM2018-06-01T18:52:01+5:302018-06-01T18:52:01+5:30
वाशिम : जिल्ह्यातील नऊ सेवा सहकारी संस्थेचे लेखा परीक्षणाचे शुल्क मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांचे मार्फतीने अकोला सहकारी बँकेकडे पाठविण्यासाठी एकुण आॅडीट रकमेच्या पाच टक्के प्रमाणे (एकुण ३२,२९१ रूपये) पहिला हप्ता १५ हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारणाºया जिल्हा विशेष लेखापरिक्षक कार्यालयातील तिघांना अमरावतीच्या एसीबी पथकाने ताब्यात घेतले.
वाशिम : जिल्ह्यातील नऊ सेवा सहकारी संस्थेचे लेखा परीक्षणाचे शुल्क मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांचे मार्फतीने अकोला सहकारी बँकेकडे पाठविण्यासाठी एकुण आॅडीट रकमेच्या पाच टक्के प्रमाणे (एकुण ३२,२९१ रूपये) पहिला हप्ता १५ हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारणाºया जिल्हा विशेष लेखापरिक्षक कार्यालयातील तिघांना अमरावतीच्या एसीबी पथकाने ताब्यात घेतले. ही घटना जवाहर कॉलनी मधील लेखापरीक्षक कार्यालयामध्ये १ जून रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील नऊ सेवा सहकारी संस्थेचे सन २०१६-१७ मधील लेखा परिक्षणाचे शुल्क मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांचे मार्फत अकोला सहकारी बँकेकडे पाठवावयाचा होता. सन २०१५-१६ मधील मिळालेल्या एकुण आॅडीट शुल्क ६ लाख ४५ हजार ८२० रूपये याचे ५ टक्के प्रमाणे ३२,२९१ रूपये एवढी लाच जिल्हा विशेष लेखा परिक्षक आर.बी.काळे, उपलेखापरिक्षक पि.डी. सोनवणे व उपलेखापरिक्षक जी.एस. मुरकर यांनी संगनमत करून मागितल्याची फिर्याद अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका खासगी लेखा परिक्षकाने केली. या तक्रारीच्या पडताळणी कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांना लोकसेवक आर.बी.काळे , पि.डी. सोनवणे व जी.एस. मुरकर यांनी तक्रारदाराचे लेखा परिक्षणाचे प्रस्तावासाठी ३२,२९१ रूपये एवढी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार याने जिल्हा विशेष लेखा परिक्षक काळे यांना ही रक्कम जास्त होते काहीतरी कमी करा अशी विनंती केली. त्यावर काळे यांचेसमोरच कॅबीन मध्ये बसलेले मुरकर यांनी ३० हजार रूपये देऊन टाका असे म्हटले असता काळे यांनी ३० हजार रूपये घेण्यासाठी होकार दिला. सोनावणे यांनी तीस हजार रूपये दोन टप्यात देऊन टाका असे म्हटले. तक्रारदार यांनी दहा हजार रूपये आणून देतो असे म्हटले असता सोनावणे यांनी १५ हजार रूपये घेऊन या नंतरच साहेबांची सही घेऊन होतोहात लेखा परिक्षणाचे शुल्क मंजूरीचा प्रस्ताव तुमच्याकडे देतो. असे म्हणुन १५ हजार रूपये लाच स्विकारण्याचे मान्य केले.
शुक्रवार १ जुन रोजी एसीबीच्या (अमरावती) पथकाने सापळा रचला असता उपलेखा परिक्षक प्रशांत दिगंबर सोनावणे यांनी तक्रारदाराकडून पहिला हप्ता १५ हजार रूपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली. लाचेची रक्कम स्विकारण्यापुर्वी संगनमतामध्ये असलेले जिल्हा विशेष लेखा परिक्षक राधेशाम भगवंतराव काळे व उपलेखापरिक्षक गणेश सदाशिव मुरकर यांनाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिचरे, अपर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधिक्षक जयंत राऊत, गजानन पडघन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रूपाली पोहनकर, रविंद्र जेधे, पोलीस कर्मचारी गजानन झोडपे, श्रीकृष्ण तालन, विनोद कुंजाम, ताहेर अली, युवराज राठोड, पंकज बोरसे, तुषार देशमुख, माधुरी साबळे, चंद्रकांत जनबंधु, मो. अकबर यांचा समावेश असलेल्या पथकाने केली.