जिंतूर येथील कोरोनाबाधीत मृत महिलेच्या संपर्कात चिखलीचे तीनजण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:28 AM2020-05-26T11:28:10+5:302020-05-26T11:28:31+5:30
परभणी, जालना आणि बुलडाणा जिल्ह्यासोबतच वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील एका महिलेसह तीनजण संपर्कात आल्याचे उघड झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सांगवी (ता. जिंतूर, जि.परभणी) येथील मृत महिलेच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल २३ मे रोजी प्राप्त झाला. त्यात ती कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तीच्या ‘हाय रिस्क’ संपर्कात जालना, बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांसोबतच चिखली (ता.रिसोड) येथील तीनजण आले असून संबंधितांचे मंगळवार, २६ मे रोजी ‘थ्रोट स्वॅब’ घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीकरिता पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.
सांगवी येथील एका महिलेचा २२ मे रोजी परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पुर्वी तीचा ‘थ्रोट स्वॅब’ घेण्यात आला. त्याचा अहवाल २३ मे रोजी प्राप्त होऊन त्यात सदर महिला कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मृत महिलेच्या संपर्कात कोण आले, याची चाचपणी बुलडाणा प्रशासनाने केली असता, परभणी, जालना आणि बुलडाणा जिल्ह्यासोबतच वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील एका महिलेसह तीनजण संपर्कात आल्याचे उघड झाले.
त्यानुसार, परभणी जिल्हा प्रशासनाने वाशिम जिल्हा प्रशासनाकडे पत्र पाठवून याबाबत अवगत केले. ही वार्ता चिखली गावात पसरताच मोठी खळबळ उडाली. संबंधित तीघांनाही चिखली येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून मंगळवारी त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार असल्याचे डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.