लाचप्रकरणी आरोपींना तीन दिवसांची कोठडी
By admin | Published: June 16, 2016 02:15 AM2016-06-16T02:15:06+5:302016-06-16T02:15:06+5:30
रिसोड पंचायत समितीमधील लाचखोरी प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी.
रिसोड (वाशिम): रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे खोदकाम व बांधकामाची उर्वरित रक्कम मिळण्याकरिता लाच मागणार्या रिसोड पंचायत समितीच्या दोघांना मंगळवारी रंगेहात पकडल्यानंतर बुधवारी या दोघांनाही वाशिम येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विद्यमान न्यायालयाने या दोन्ही आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा एसीबीचे पोलीस निरीक्षक आनंद रुईकर यांनी दिली. तांत्रिक अधिकारी मंगेश भारत जाधव व रोजगार सेवक माणिक रामभाऊ अवचार यांची पोलीस कोठडीदरम्यान चौकशी केली जात असून, शाखा अभियंता तेजराव तुकाराम जाधव हे अद्यापपर्यंंंत फरार आहेत. रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील तक्रारदार शेतकर्याच्या तक्रारीनुसार, सदर शेतकर्याला रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदान तत्त्वावरील सिंचन विहिरीचा लाभ मिळाला होता. या सिंचन विहिरीकरिता तीन लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याने तक्रारदाराने विहिरीचे खोदकाम व बांधकाम सुरू केले. याकरिता शासनाकडून आतापर्यंंंत १ लाख ८५ हजार रुपये धनादेशाद्वारे मिळाले आहेत. एप्रिल २0१६ मध्ये विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्याने पंचायत समिती रिसोड येथे उर्वरित १ लाख १५ हजार रुपये मिळण्याकरिता विहीर खोदकाम व बांधकामाची फाइल रिसोड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात सादर केली. त्याकरिता शाखा अभियंता जाधव, तांत्रिक अधिकारी जाधव, रोजगार सेवक माणिक अवचार यांनी ६५00 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. या तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने मंगळवारी रिसोड पंचायत समिती परिसरात तांत्रिक अधिकारी जाधव आणि रोजगार सेवक अवचार याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले होते. या दोघांनाही बुधवारी वाशिमच्या विशेष न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कोठडीदरम्यान आरोपींकडून विविध बाबींची चौकशी केली जाणार आहे.