जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 06:13 PM2019-08-07T18:13:31+5:302019-08-07T18:13:36+5:30
तीन आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ आॅगस्ट रोजी ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जुन्या भांडणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन वाशिम शहरातील लहुजी नगर येथे वास्तव्यास असलेल्या मनोज मावळे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यास गंभीर जखमी करणाºया तीन आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ आॅगस्ट रोजी ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
प्राप्त माहितीनुसार, २६ जून २०१५ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी मनोज मावळेची आई लिलाबाई यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले होते, की त्यांच्या घराशेजारी राहणारा इंद्रजित जनार्धन ताजणे हा घटनेच्या रात्री मद्य प्राशन करून होता. त्यास माझा मोठा मुलगा मनोज मावळे याने तू माज्या वडिलांना मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला. त्यास तूच जबाबदार आहे, असे म्हटल्यानंतर इंद्रजितने मनोजला शिविगाळ केली. तसेच पत्नी नंदा इंद्रजित ताजणे हिच्या हाताने घरातील सुरा मागविला. यावेळी संतोष प्रल्हाद इंगोले याने मनोजचे हात धरले व इंद्रजितने सुरा डोक्यावर मारून मनोजला गंभीर जखमी केले. त्याचा जीव घेण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल्याची तक्रार मनोजची आई लिलाबाई यांनी पोलिसांत केली होती. त्यावरून वाशिम पोलिसांनी नमूद तीनही आरोपींविरूद्ध कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.
दरम्यान, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदार तपासल्यानंतर दोषारोप सिद्ध झाल्याने विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधिश उल्हास हेजीब यांनी आरोपी इंद्रजित ताजणे, संतोष इंगोले आणि नंदा ताजणे या तीनही आरोपींना प्रत्येकी ७ वर्षे सक्षम कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. अभिजित व्यवहारे यांनी काम पाहिले.