कार्यालयीन दप्तर सादर न करणारे तीन ग्रामसेवक तुरुंगात!
By admin | Published: February 19, 2017 02:01 AM2017-02-19T02:01:00+5:302017-02-19T02:01:00+5:30
वाशिम जिल्हाधिकार्यांचे आदेश; तिघे फरार.
वाशिम, दि. १८- कार्यमुक्त झाल्यानंतरही कार्यरत ग्रामसेवकांकडे कार्यभार न देणे, स्थानिक निधी लेखा परीक्षणासाठी कार्यालयीन दप्तर उपलब्ध करून न देणार्या सहा ग्रामसेवकांना दिवाणी कारागृहात डांबून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी जानेवारी महिन्यात दिले होते. त्यानुसार १८ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने तीन ग्रामसेवकांना ताब्यात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या सुपूर्द केले. या ग्रामसेवकांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली.
मालेगाव तालुक्यातील ग्रामसेवक एस.एम. ठाकरे, एस.एच. अंभोरे, एस.एम. कांबळे, पी.यू. चिकटे, ए. एस. साठे, व्ही.पी. चिकटे या सहा ग्रामसेवकांनी कार्यमुक्त झाल्यानंतर रुजू होणार्या संबंधित ग्रामसेवकांना कार्यालयीन दप्तर, अभिलेखे सोपविलेच नाही. त्यामुळे स्थानिक निधी लेखा परीक्षणासाठी या ग्रामसेवकांनी दप्तर उपलब्ध झाले नाही. गटविकास अधिकारी आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या निर्देशाकडेदेखील त्यांनी तब्बल तीन वर्षांपर्यंत दुर्लक्ष केले. त्यानंतर दप्तर सोपविण्याची वारंवार संधीही दिली. तथापि, या निर्देशांकडे संबंधित ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्याने शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सदर प्रकरण सोपविले. जिल्हाधिकार्यांनी संबंधित ग्रामसेवकांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १७९, कलम १ नुसार नोटिस देऊन त्यांच्या ताब्यातील ग्रामपंचायतीचे अभिलेखे २७ डिसेंबर २0१६ पर्यंत कार्यरत ग्रामसेवकांना अथवा गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव यांच्या स्वाधीन करण्याबाबत आदेश दिले; मात्र संबंधितांनी या आदेशाचे उल्लंघन करून त्यांच्या ताब्यातील अभिलेखे हस्तांतरित केले नाही.
१८ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने एस.एम. ठाकरे, एस.एच. अंभोरे व एस.एम. कांबळे या तीन ग्रामसेवकांना ताब्यात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या सुपूर्द केले. जिल्हा प्रशासनाने या ग्रामसेवकांची जिल्हा कारागृहात रवानगी केली. उर्वरित पी.यू. चिकटे, ए. एस. साठे, व्ही.पी. चिकटे हे तीन ग्रामसेवक फरार असून, पोलीस त्यांच्या शोधात आहेत. कर्तव्यात कसूर करणार्या कर्मचार्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्याची जिल्हय़ातील ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे कामचुकार व कर्तव्यात कसूर करणार्या कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.