तीन दिवसांत मोजावी लागणार साडेचार लाख क्विंटल तूर!

By admin | Published: May 29, 2017 01:23 AM2017-05-29T01:23:37+5:302017-05-29T01:23:37+5:30

‘नाफेड’समोर उभे ठाकले बिकट आव्हान : मुदत वाढवून देण्याबाबत बाजार समित्यांचे शासनाला पत्र

Three lakh quintals must be paid in three days! | तीन दिवसांत मोजावी लागणार साडेचार लाख क्विंटल तूर!

तीन दिवसांत मोजावी लागणार साडेचार लाख क्विंटल तूर!

Next

सुनील काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ११ मे पासून २७ मे पर्यंत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून १७ हजारांपेक्षा अधिक कास्तकारांना ‘टोकन’ देण्यात आले असून, चार लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर मोजायची बाकी आहे. ३१ मे या अंतिम मुदतीनुसार, येत्या तीन दिवसांत ही तूर मोजण्याचे आव्हान ‘नाफेड’समोर उभे ठाकले आहे; परंतु कितीही आटापिटा केला, तरी दैनंदिन हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर मोजणे शक्य नसल्याने मुदत वाढवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने शासन स्तरावरून मिळालेले तोकडे हमीदर, बारदाना टंचाई, खरेदी केलेली तूर साठविण्याकरिता गोदामांची कमतरता यासह तत्सम अनेक कारणांमुळे तूर उत्पादक शेतकरी अक्षरश: जेरीस आले असताना त्यातून सुटका होण्याऐवजी समस्यांमध्ये अधिकच भर पडत चालली आहे.
या ना त्या कारणांवरून लांबत चाललेल्या तूर खरेदी प्रक्रियेस शासनाने ४ मे रोजी ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार, बाजार समित्यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘टोकन’ देऊन ‘नाफेड’मार्फत तूर मोजणी करावी, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, दैनंदिन तूर मोजणी प्रक्रियेच्या तुलनेत ‘टोकन’साठी बाजार समित्यांमध्ये येणारे शेतकरी आणि अंतिम मुदत अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असताना लाखो क्विंटल तुरीची मोजणी प्रलंबित असल्याने हा मुद्दा गंभीर स्वरूप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून १५ मे पासून २७ मे पर्यंत ६ हजार २०० शेतकऱ्यांना ‘टोकन’ देण्यात आले. या शेतकऱ्यांची तूर जवळपास १ लाख ६० हजार क्विंटल आहे. कारंजा बाजार समितीने ३ हजार १०० शेतकऱ्यांना टोकन दिले असून, ८० हजार क्विंटल तूर मोजणी बाकी आहे. रिसोड बाजार समितीत ४ हजार ७०० शेतकऱ्यांची नोंद झाली असून, ९० हजार क्विंटल तूर मोजणी व्हायची आहे. मंगरूळपीर येथे ३३३५ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले असून, ६० हजार क्विंटल तूर मोजण्याची प्रक्रिया बाकी आहे. तसेच अनसिंग आणि मालेगाव येथेही जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले असून, ७५ हजार क्विंटल तूर ३१ मे पर्यंत मोजण्याचे बंधन टाकण्यात आलेले आहे.
तथापि, संपूर्ण जिल्ह्यात साडेचार लाख क्विंटलपेक्षा अधिक असलेली ही तूर मोजण्याकरिता किमान दोन महिने आणखी लागणार असल्याची शक्यता बाजार समित्यांनी वर्तविली असून, ३१ मे ही अंतिम मुदत न ठेवता त्यात वाढ करण्याची गळ शासनाकडे घातली आहे. याप्रकरणी शासन काय भूमिका घेते, याकडे ‘नाफेड’, बाजार समित्या आणि जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नोंदणी लाखो क्विंटल; दैनंदिन मोजणी केवळ ७०० ते हजार क्विंटल!
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून १७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ‘टोकन’ देण्यात आले. त्यानुसार, साडेचार लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर ३१ मे या अंतिम मुदतीपर्यंत मोजून घ्यावी लागणार आहे. मात्र, ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवर सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत केवळ ७०० ते हजार क्विंटल तूर मोजणेच शक्य होत असल्याने लाखो क्विंटल तूर कधी मोजली जाणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय तूर साठवण्याकरिता गोदामांमध्ये जागा शिल्लक नाही, बारदाना टंचाईचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. एकूणच या सर्व समस्यांमुळे ‘नाफेड’ची तूर खरेदी प्रक्रिया अडचणीत सापडली आहे.

चुकारेही मिळेना; शेतकरी संकटात!
शेतकऱ्यांनी ‘नाफेड’कडे ५०५० रुपये प्रतिक्विंटल दराने तुरीची विक्री केली. मात्र, हजारो शेतकऱ्यांना अद्याप त्याचे चुकारे मिळालेले नाहीत. ‘नाफेड’ने नेमलेल्या संस्थांच्या खात्यांमध्येही पैसे नसल्यामुळे चुकाऱ्यापोटी दिले जाणारे धनादेश ‘बाऊन्स’ होत असल्याचा प्रकारही घडत आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांनी तूर खरेदी प्रक्रियेस मुदत मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानुसार, ‘नाफेड’सोबतच प्रशासनाने देखील शासनाला याबाबत अवगत केले आहे. शासन स्तरावरून निर्देश मिळाल्यास निश्चितपणे जिल्ह्यातील तूर मोजणी आणि खरेदी प्रक्रियेस मुदतवाढ दिली जाईल.
- राहुल द्विवेदी
जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Three lakh quintals must be paid in three days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.