आर्थिक नुकसान व जीवे मारण्याची धमकी देणा-यास तीन महिन्यांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:05 PM2017-12-08T22:05:20+5:302017-12-08T22:08:09+5:30
दुकानातील साहित्याची फेकफाक करून दोन हजार रुपयांचे नुकसान करीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगरुळपीर येथील न्यायालयाने आरोपीला संयुक्त अडिच हजार रुपये दंड आणि तीन महिने कारवासाची शिक्षा ८ डिसेंबर रोजी सुनावली, तसेच दोन कलमांतील दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त प्रत्येकी ३० दिवसांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: फिर्यादीच्या दुकानातील साहित्याची फेकफाक करून दोन हजार रुपयांचे नुकसान करीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगरुळपीर येथील न्यायालयाने आरोपीला संयुक्त अडिच हजार रुपये दंड आणि तीन महिने कारवासाची शिक्षा ८ डिसेंबर रोजी सुनावली, तसेच दोन कलमांतील दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त प्रत्येकी ३० दिवसांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. मंगरुळपीर शहरातील डिसेंबर २०१४ च्या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
मंगरुळपीर शहरातील पंचशील नगरातील रहिवासी फिर्यादी ज्ञानदेव तुकाराम भगत याने २३ डिसेंबर २०१४ रोजी पोलीस स्टेशन. मंगरुळपीर येथे फिर्याद दिली होती की, आरोपी भुपेंद्र शंकर राऊत रा.शेलगाव ता.मंगरुळपीर याने फिर्यादीच्या कटलरीचे दुकानात जाऊन हे दुकान खाली कर, असे म्हणत दुकानातील साहित्याची फेकफाक करुन २००० रुपयांचे नुकसान केले व जीवाने मारुन टाकीन अशी धमकी दिली होती. या फिर्यादीवरून मंगरुळपीर पोलिसांत आरोपीविरोधात अप नं. ३२४/१४ कलम ४२७,४४७,५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत परळकर यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयाल दोषारोपपत्र दाखल केल होते. या प्रकरणी साक्ष पुराव्याच्या आधारे आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होत असल्याने न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मंगरुळपीर एम.आर.पनाड यांनी कलम ४२७/४४७, ५०६ भादंविनुसार आरोपीस दोषी धरून सदर गुन्ह्यासाठी कलम ४२७ नुसार ३ महिने कारवासाची शिक्षा व १००० रु दंड, कलम ४४७ नुसार ५०० रु दंड, दंड न भरल्यास ३० दिवसांच्या कारवासाची शिक्षा, कलम ५०६ नुसार १०००दंड, दंड न भरल्यास ३० दिवस कारवासाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पारणकर, सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून अब्दुल मतीन यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून उत्तम गोलाम व हमिद भुरीवाले यांनी काम पाहिले.