व्हॉट्स अँप ग्रुप अँडमिनसह तिघांवर गुन्हा दाखल
By admin | Published: July 15, 2015 11:23 PM2015-07-15T23:23:34+5:302015-07-15T23:23:34+5:30
शेगाव येथील घटना; आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ अपलोड.
शेगाव (जि. बुलडाणा) : सोशल साइट व्हॉट्स अँपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ टाकल्याप्रकरणी शहर पोलिसांनी १४ जुलै रोजी उशिरा रात्री ग्रुप अँडमिनसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्हॉट्स अँपवरील सुलतान नामक ग्रुपकडून ग्रुपमधील सदस्य शाहरूख डॉन व इस्माईल किंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ टाकले होते. याबाबत याच ग्रुपमधील सदस्य शे. सलीम शे. उमर (३२ रा. ईदगाह प्लॉट, शेगाव) यांनी १४ रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी व्हॉट्स अँपवर आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या शाहरूख डॉन व इस्माईल किंग या दोघांसह ग्रुप अँडमिन सलमान शे. रहिम यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १५३ (अ) ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. व्हॉट्स अँपवरील आक्षेपार्ह मजुकरामुळे गुन्हे दाखल होण्याचा शेगाव शहरातील पहिलाच प्रकार असल्याने व्हॉट्स अँप युजर धास्तावले आहेत. पुढील तपास एपीआय किशोर तावडे करीत असून, त्यांनी इंटरनेटचा वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे.